देवीच्या ४,१२१ एकर इनाम जमिनीवर डल्ला? तुळजाभवानी मंदिराच्या कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू
श्री तुळजाभवानी देवी मंदिराशी संबंधित आणखी एका कथित घोटाळ्याची चर्चा सुरू झाली आहे. मंदिराला तत्कालीन निजाम सरकारकडून इनाम म्हणून मिळालेल्या ४ हजार १२१ एकर जमिनीचा नियमबाह्य हस्तांतरण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या प्रकरणाची तक्रार मंदिर महासंघाने पुराव्यांसह राज्य सरकारकडे केली असून, काही शासकीय अधिकारी आणि भूमाफियांनी संगनमत करून देवस्थानाच्या जमिनी खाजगी व्यक्तींच्या नावे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तत्कालीन निजाम सरकारने श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या धार्मिक आणि व्यवस्थापकीय खर्चासाठी सुमारे ४,१२१ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. विद्यमान कायद्यांनुसार अशा देवस्थानाच्या इनामी जमिनींची खरेदी-विक्री किंवा खासगी हस्तांतरण करता येत नाही. तसेच या जमिनींना कुळ कायदाही लागू होत नाही.
मात्र, मंदिर महासंघाचे अध्यक्ष सुनील घनवट यांनी आरोप केला आहे की, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून महसूल नोंदींमध्ये फेरफार करत या जमिनी खाजगी व्यक्तींच्या नावावर केल्या.
सरकार ॲक्शन मोडमध्ये
तक्रारीची गंभीर दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वीही तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदीच्या दागिन्यांबाबत कथित घोटाळ्यांची प्रकरणे समोर आली होती. आता हजारो एकर इनामी जमिनीच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा समोर आल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महसूल नोंदींची होणार तपासणी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित ७/१२ उतारे, महसूल नोंदी आणि जमीन हस्तांतरणाची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. हा फेरफार नेमका कधी झाला, त्यात कोणाचा सहभाग होता आणि सध्या संबंधित जमीन कोणाच्या ताब्यात आहे, याचा तपास चौकशी अहवालातून स्पष्ट होणार आहे.
चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे राज्यभरातील भाविक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tuljabhavani Land Scam, Tuljabhavani Temple News, Dharashiv News, Temple Land, Maharashtra Breaking News
