मराठवाडा , विदर्भात आज मुसळधार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….
पुणे : मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे पुन्हा काही दिवस मुसळदार पावसाचा इशारा दिला आहे .
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्रतेने कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. ते ओडिशावर केंद्रित आहे आणि पुढील २४ तासांत दक्षिण छत्तीसगडकडे सरकत कमकुवत होईल. ३० सप्टेंबर रोजी उत्तर अंदमान समुद्रावर एक वरच्या हवेचा चक्राकार प्रवाह तयार होण्याची शक्यता आहे, यामुळे १ ऑक्टोबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. यामुळे, २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पूर्व आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. २८ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात खूप मुसळधार पाऊस पडू शकतो.
२८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार
पश्चिम आणि ईशान्य भारतावरही हवामानाचा परिणाम होईल. गोवा, महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ३ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये २९ सप्टेंबर रोजी खूप मुसळधार पाऊस पडू शकतो. ईशान्य भारतात, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर २ आणि ३ ऑक्टोबर रोजी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारमध्ये २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे वाहतील. त्यामुळे, लोकांना सतर्क राहण्याचा आणि हवामान खात्याच्या इशाऱ्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालमध्ये मुसळधार
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, यामुळे पुढील सात दिवस राज्याच्या अनेक भागात पाऊस पडेल. दक्षिण बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी कोलकातामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत असाच पाऊस पडेल.
राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान!
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (28 सप्टेंबर 2025) च्या 5.30 वाजता भारतीय प्रमाणवेळेवर आधारित राष्ट्रीय बुलेटिननुसार पश्चिम विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर पूर्व विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा गेल्या 6 तासांत 43 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकला आणि 28 सप्टेंबर 2025च्या 5.30 वाजता भारतीय प्रमाणवेळेवर पश्चिम विदर्भ आणि परिसरात, अक्षांश 20.30° उत्तर आणि रेखांश 77.0° पूर्वेजवळ, अकोला (विदर्भ) पासून 50 किमी दक्षिणेस, औरंगाबाद (मराठवाडा) पासून 180 किमी पूर्व-ईशान्येस, नाशिक (मध्य महाराष्ट्र) पासून 330 किमी पूर्वेस आणि सुरत (गुजरात) पासून 450 किमी पूर्व-आग्नेयेस केंद्रीत झाला. पुढील 12 तासांत तो मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातून जवळजवळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होऊन एका चांगल्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
मराठवाड्यात यंदाच्या वर्षी (2025) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी 581.7 मिलिमीटरच्या तुलनेत 708.1 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 120 टक्क्यांहून अधिक आहे. जालना जिल्ह्यात सरासरी 630.1 मिलिमीटरच्या तुलनेत 771.8 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 128 टक्के आहे. बीडमध्ये सरासरी 566 मिलिमीटरच्या तुलनेत 835 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो सरासरीच्या 147.6 टक्के आहे. लातूरमध्ये सरासरी 706 मिलिमीटरच्या तुलनेत 894 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो सरासरीच्या 126.7 टक्के आहे. धाराशिवमध्ये सरासरी 603.1 मिलिमीटरच्या तुलनेत 924.6 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 153.3 टक्के आहे. नांदेडमध्ये सरासरी 814.4 मिलिमीटरच्या तुलनेत 1085 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 133.2 टक्के आहे. परभणीमध्ये सरासरी 661.3 मिलिमीटरच्या तुलनेत 874 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो सरासरीच्या 114.9 टक्के आहे. हिंगोलीत सरासरी 795.3 मिलिमीटरच्या तुलनेत 1062.8 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 133.6 टक्के आहे.
सोलापूरमध्ये रेड अलर्ट, जनजीवन विस्कळीत
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलकोट वाघदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. माढा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दोन दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी शिरलेल्या घरांची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पुराचा धोका वाढल्यानं अनेक कुटुंबांवर संसार एका गाडीमध्ये भरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. माढ्यामधील उंदरगाव येथील दत्तात्रय कोळी यांच्या कुटुंबालाही याचा फटका बसला आहे. पूर ओसरला म्हणून कोळी कुटुंब घरामध्ये पोहोचले होते, पण “धान्य सुटलेलं म्हणून फेकून द्यावं लागलं.” आता उरलं सुटलं सामान घेऊन हे कुटुंब दुसरीकडे निघाले आहे.
येवल्यातही पावसाचा जोर कायम
नाशिक शहारासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरू आहे, त्रंबकेश्वर मध्येही रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने शहाराती रस्त्याने नदी नाल्याचे स्वरुप आले आहे,।शहरांतील मुख्य बाजारपेठ, कुशावर्त तीर्थ परिसरात पहाटे पासुनच पाणी असल्यानं धार्मीक विधीसाठी त्रंबकेश्वर नगरीत आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. सध्या पावसाचा जोर मंदावला आहे, मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी।आल्यानं काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
