Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संघाच्या कार्यक्रमाला जाणार हि बातमी खोटी , कमलताई गवई यांचे स्पष्टीकरण

Spread the love

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसून यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेली बातमी खोटी आहे. मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाही. आरएसएसचे हे षडयंत्र आहे. मी निमंत्रण स्वीकारलेले नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी दिले आहे.

कमलताई यांचे स्वहस्ताक्षरातील पत्र समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक राहीन, असे कमलताई गवई यांनी सुरूवातीलाच नमूद केले आहे.

येत्या ५ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा हा अमरावतीत श्रीमती नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण, आता कमलताई गवई यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात…?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे ‘आरएसएस’च्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर होणार नाही. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारे दु:ख होऊ देणार नाही.

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी. विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली, तरी आम्हाकरीता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्वपूर्ण आहे. अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते. तमाम माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा. मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आरएसएसचे षडयंत्र आहे. सदर्हू निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा. असे कमलताई गवई यांनी पत्रात नमूद केले आहे.

कमलताई गवई या आरएसएसच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची बातमी प्रसारीत झाल्यानंतर देशभरात त्यावर चर्चा सुरू झाली. माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते. दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई हे या स्मारक समितीचे सदस्य आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!