Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं”; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल….

Spread the love

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “”जीव जाईपर्यंत आम्ही लढणार आहोत. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे. तुमचा तुम्ही तो घ्या. तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. हा माझा वैयक्तिक विषय नाहीये. मी कुठला गुन्हेगार नाहीये. मी कधीच कायदा हातात घेतला नाही. आम्ही फक्त ओबीसींची बाजू मांडतोय. आमच्यावर हल्ले होत आहेत.”

“तुम्ही ओबीसींची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. आमच्यावर हल्ले होत आहेत, त्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत. या गोष्टीचं उत्तर… ओबीसींनी आता महाराष्ट्रात राहायचं की नाही राहायचं, याचं आम्हाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी द्यावं”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, “आजचा नववा हल्ला आहे. आम्ही उपोषण केल्यापासून आजपर्यंत नऊ वेळा हल्ले झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे की, आम्ही जगायचं की नाही, तेवढंच आम्हाला सांगा. आम्ही महाराष्ट्रात जगायचं की नाही? आम्ही घराच्या बाहेर पडायचं की नाही, तेवढंच आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं”, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

हाके म्हणाले, जीव जाईपर्यंत लढा सुरूच राहणार

“लढा सुरूच राहणार. जीव जाईपर्यंत लढा असाच सुरू राहणार. आम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नाहीये. आम्ही या महाराष्ट्रातील ६० टक्के ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहोत. तुम्ही जे काही वाटोळ करायचं आहे, ते केलं आहे. ओबीसींनी बाहेर यायचं नाही. ओबीसींनी बोलायचं नाही, अशी जर कुणाची भूमिका असेल, तर मुख्यमंत्र्यांनी महोदय, लोकशाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. महाराष्ट्र बोलत नाही, याचा अर्थ त्याला काही कळत नाही, या भानगडीत तुम्ही पडू नका”, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला.

लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर कसा झाला हल्ला?

लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, “दौंडमार्गे आम्ही नगर बायपासने पाथर्डीकडे वळणार होतो. तिथे सारंगी नावाचं हॉटेल आहे. आमच्यासोबत सुरक्षेसाठी दोन पोलिसांच्या गाड्या होत्या. दहा-बारा पोलीस अधिकारी कर्मचारी आमच्यासोबत होते. वर्दीला (पोलिसांना) न घाबरता आठ-दहा लोकांनी बाबूंने गाडीवर हल्ला केला.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!