Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NandedNewsUpdate : पोलिसांना झालंय काय ? नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण ….

Spread the love

नांदेड : नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्टेलमधील रुममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना आहे. याप्रकरणी, एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर आता संबंधित पोलीस शिपायाचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलिसांनी  मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर येताच या घटनेची दखल घेत भाग्यनगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी आकाश सावंतसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याशिवाय पोलीस कर्मचारी आकाश सावंत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी की , माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करतोय. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेल मध्ये तो राहतो. 5 जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी आकाश सावंत तिथे आला, त्याच्या सोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे अन्य दोन तरुण आले. मोटारसायकल आणि सोन्याची चेन चोरी केली का? असे  विचारून तिघांनी प्रथमेशला बाहेर नेले. त्यानंतर, अशोक नगर, गोकुळनगर, आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला, पुन्हा प्रथमेशच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण केली. घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, त्याच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी थेट भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल केला.

पोलीस कर्मचारी सावंतसह त्याचा मित्र क्षितिज कांबळे यांनी काठी घेऊन प्रथमेशला मारहाण केली, त्या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओत पोलीस कर्मचारी आकाश सावंत हा वर्दीवर आहे. त्यामध्ये, मीच मारहाण केली असे तो बोलताना दिसून येतो. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अशा पद्धतीने काही युवक विद्यार्थ्यांना दमदाटी करून पैसे वसुली करतात का, किंवा खंडणी घेतात का? या दृष्टीने देखील तपास सुरू असून अशा तक्रारी असल्यास पोलिसांना कळविण्याचे  आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. दरम्यान, खासगी कोचिंग क्लासेस, आणि हॉटेल चालकांची बैठक घेऊन याबाबत त्यांची विचार न करण्यात आली. या भागात तक्रार पेढी देखील लावण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!