Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा आणखी एक निर्णय , अध्यादेश जारी ….

Spread the love

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. त्यानंतर आता याच प्रकरणी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जीआरदेखील काढण्यात आला आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये बदल करावा, अशी मागणी केली जात होती. त्या मागणीनुसार राज्य सरकारने त्या समितीमध्ये बदल करत नव्या समितीची स्थापना केली होती. सीआयडी आणि या समितीकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तपासासाठी न्यायालयीन समितीचीदेखील मागणी काही जणांकडून केली जात होती. या प्रकरणातील प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. केवळ कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा फरार आहे. त्याचादेखील शोध सुरु आहे. तसेच हत्या प्रकरणाचा कट कोणी रचला होता, हत्या का केली? याचा सखोल तपास केला जातोय. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडून कोर्टात अनेक दावे करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली आता या प्रकरणाचा तपास होणार आहे. तहलियानी यांनी मुंबई 26/11 बॉम्ब हल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे. तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत. पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची मोठी जबाबदारी दिली आहे.

राज्य शासनाने जीआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मा. विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देताना मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केल्यानुसार मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या प्रकरणी शासन निर्णय घेण्यात आला की, मस्साजोग ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश मा. एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली “एक सदस्यीय चौकशी समिती” गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!