AccidentNewsUpdate : चार चाकी वाहन विहिरीत पडून चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत चार चाकी वाहन विहिरीत पडून अपघाताची दुर्दैवी घटना घडली. कठडा किंवा पायऱ्या नसलेल्या एका विहिरीत हे वाहन कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहित मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय 29) रामहरी गंगाधर शेळके (वय 35), किशोर मोहन पवार (वय 30) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय 25) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
जामवाडीतील या भीषण व ह्रदद्रावक अपघाताच्या घटनेने जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. जामखेड पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. बोलेरो या चारचाकी वाहनाने रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर हे प्रवास करत होते. जामवाडी गावात रस्त्याचे काम चालू असल्याने येथील रस्त्यावर खडी टाकलेली होती. त्यामुळे, वाहनचालकास अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याकडला असलेल्या विहिरीत पडले. विहीर अतिशय खोल व विहिरीत पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे, विहिरीतील पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. क्रेनच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने विहिरीत कार व सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.