MaharashtraPoliticalUpdate : आज दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारावार शिक्कामोर्तब , शिंदे यांचा पाच आमदारांना धप्पा ….

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दुपारी दिल्लीत जाणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. या नेत्यांसोबत ही सदिच्छा भेट असली तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीचे नेते आणि अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेत मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे. आता, सत्ता वाटपाचा हा तिढा आज दिल्लीत सुटण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणाऱ्या 5 आमदारांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने केलेल्या विरोधामुळे त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागणार आहे.
शिंदे यांचा पाच आमदारांना धप्पा ….
एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यावरून भाजपमधून विरोध देखील होत आहे. अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर अशा नेत्यांना मंत्रीपदं देऊ नयेत, अशी भाजपची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या विरोधामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरील पेच वाढताना दिसत आहेत. तानाजी सावंतांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, यासाठी शिंदे स्वत: आग्रही आहेत. तर अब्दुल सत्तार किंवा संजय राठोड सहजासहजी मंत्रीपदाचा दावा सोडणार नाहीत, अशीही चर्चा आहे. तर दीपक केसरकर यांनी निवडणुकी आधीच ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामुळे केसरकर हे एक पाऊल मागे घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.
आमदारांची नाराजी नको म्हणून अडीच वर्षाचा पार्याय ….
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर, इच्छुकांची संख्या त्याहून अधिक आहे. त्यामुळे मंत्रिपदांबाबत एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना फिरती मंत्रीपदं देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. इच्छुक आमदारांना अडीच-अडीच वर्षांसाठी फिरती मंत्रीपदं दिली जाण्याची शक्यता आहे.