बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अखेर फरार संस्थाचलक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक , १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर नंतर याच प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक करून एसआयटीने त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले, जिथे एका गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, दुसऱ्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली असून, सध्या दोघेही एसआयटीच्या ताब्यात आहेत. उद्या (शुक्रवार ४ ऑक्टोबर) त्यांना परत कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिनाभर फरारी असलेले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे न्यायालयाने फटकारल्यानंतर ४४ दिवसांनी सापडले. बदलापूर पोलिसांनी बुधवारी दोन्ही आरोपींना कर्जतमध्ये अटक केली.
ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाने बदलापूर सहित राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी चकमकीत खातमा केल्यानंतर विरोधकांकडून शाळेच्या अध्यक्ष सहित संचालकांना वाचवण्यात येत असल्याचा उघडपणे आरोप केला जात होता. न्यायालयानेही याबाबत पोलिसांची कानउघाडणी केली होती त्यानंतर बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी असलेल्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कर्जत परिसरात बेड्या ठोकल्या.
सदर प्रकरण घडल्यापासून हे दोन्हीही आरोपी संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे बदलापूर सहित ठाणे पोलिसांना हुलकावणी देत होते असे सांगण्यात येत होते पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की हे दोघे पोलिसांपासून आपला बचाव करण्यासाठी कर्जत परिसरात लपून बसले होते. दरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरण ज्या शाळेत घडले, तिथल्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे.
या प्रकरणातील आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना बदलापूर पोलिसांनी कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केले. दरम्यान, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे तसेच वेळेत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी पी मुळ्ये यांनी १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.
बदलापूर प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कस्टडी सुनावली असली तरीही दुसऱ्या गुन्ह्याची सुनावणी बाकी असल्याचे कारण देत बदलापूर पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपींचा ताबा घेतला आहे. या प्रकरणातील सुनावणी उद्या पुन्हा कल्याण न्यायालयात होणार आहे. पहिल्या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. मात्र, पुन्हा पोलिसांनी त्यांना दुसऱ्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.