MaharashtraNewsUpdate : अखेर मराठी माणसांच्या तक्रारीचा आवाज केंद्राने ऐकला , पूजा खेडकरच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती गठीत ….

मुंबई : अखेर बहुचर्चित वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधातील आवाजाची दखल घेत केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रायलाने अतिरिक्त सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समिती स्थापन केली आहे. या सदस्याने पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांची आणि आतापर्यंतच्या वर्तनाची चौकशी करून पुढच्या दोन आठवड्यामध्ये या समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतके दाखवले होते . त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरोपांची करणार चौकशी…
दरम्यान पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही त्या गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे.
आज दिवसभरात आयएएस अधिकारी पूजा खेडकर त्यांच्यावरील विविध आरोपांनी चर्चेत असतानाच चौकशीचे वृत्त आले आले आहे. आपल्या खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्याने त्या आधी चर्चेत आणि नंतर अडचणीत आल्या. यावर माध्यमातून बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचे गेट उघडायला खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी नकार दिल्याने दिवसभर हे प्रकरण चर्चेत होते.
The Central Government has constituted a single-member Committee, chaired by a senior officer of the rank of Additional Secretary to Government of India to verify the candidature claims and other details of IAS Puja Manorma Dilip Khedkar, a candidate of Civil Services…
— ANI (@ANI) July 11, 2024
दरम्यान वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असे त्यात म्हटले आहे.
सध्या पूजा खेजकर वाशिमध्ये रूजू
आरोप प्रत्यारोपानंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. दरम्यान पुण्यात ऑडी कारवरील कारवाईबाबत पूजा खेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.