आमचे हक्काचे आरक्षण आम्हाला द्या , सरकारसह मनोज जरांगे यांचा महाविकास आघडीवरही हल्ला बोल , भुजबळांवर पुन्हा टीका ..

बीड : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांची बीड मधील सभा आज प्रचंड गाजली . या रॅलीला मराठा समाजाने प्रचंड प्रतिसाद दिल्याचे जाणवले . आजच्या बीडमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नेत्यांना इशारा देत महायुती व महाविकास आघाडीलाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागत मराठा समाजाला एकजुटीने राहण्याचे आगामी निवडणुकीत एकत्र राहण्याचे आवाहन केले.
हिंगोलीतून सुरू झालेल्या शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज बीडच्या माय-बाप जनतेनं रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते छगन भुजबळ, बीडमधील मुंडे बंधु-भगिनींवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वांनाच बीडमधून फैलावर घेतल्याचे दिसून आले . यावेळी, लोकसभा निवडणुकीत मी कुणाचे नाव घेतले नव्हते केवळ , ज्याला पाडायचंय, त्याला पाडा असे म्हटले होते मात्र, आता विधानसभेला नावे घेऊन सांगणार आहे, ह्याला पाडा म्हणून, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकांसाठी दररोज 50 जण माझ्याकडे तिकीट मागायला येतात असेही जरांगे म्हणाले.
जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीवरही हल्लाबोल
मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागतं का, असे म्हणत मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला, तसेच, हिंडू द्या त्यांना, वड्यावगळ्यानी कुठं हिंडायचंय ते. मला तर वाटतंय हे दोन्हीही एकच आहेत. कारण, तू मारल्यावनी कर, मी रडल्यावनी करतो, असंच यांचं काम दिसतंय. दोघेही एकमेकांवर का ढकलतात. जर महाविकास आघाडीवाले आले नाहीत, मग सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकार का करत नाही?. महाविकास आघाडी असू किंवा महायुती असो, कधीतरी जनतेकडे बघा. ते नाही आले म्हणता, मग तुम्ही का दिलं नाही. तुमचीच इच्छा नाही आम्हाला आरक्षण द्यायची, असे जरांगे यांनी म्हटले.
शिंदे-फडणवीसांना जरांगेंचा सवाल
टेम्पो रिक्षावर असलेल्या मराठ्यांना वाटतं माझा मुलगा नोकरी करावा, माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं नाही का?. शिंदेसाहेब तुम्हालाही सांगतो, आमचे आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा बांधवांचा एकदा उंबरा ओलांडला, तुम्हाला काळोख आणि काळोखच दिसेल, असे जरांगे यांनी म्हटले. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावं, यासाठी मुलांनी, बापांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आया-बहिणीचं कुंकू पुसलंय. घरातला माणूस गेला, आरक्षणाने घात केला, उभा संसार जाळात होरपळतोय, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यकर्त्यांना सवाल केला आहे.
कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीत का नाही?
तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि तुम्हाला हवं तेच करणार. 83 क्रमांक हा कुणबी म्हणून आहे. ओबीसीमध्ये 180 जाती होत्या, पण आता 350 च्या जवळ जाती आहेत, ज्या जाती पोटजाती म्हणून ओबीसीमध्ये घेतल्या आहेत. मग, मराठा समाजालाही ओबीसीत का घेत नाहीत, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
माझ्या जातीवर झालेला अन्याय मी नाही सहन करु शकत. ज्याला पक्षाकडून बोलायचंय त्याने बोला, मी माझ्या जातीकडूनच बोलणार. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कसं?. छगन भुजबळने ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्याविरुद्ध बोलायला सुरू केले, त्याला जातीवाद म्हणत नाहीत का, असा सवाल जरांगे यांनी विचारला. अंबडला एल्गार मेळावा झाला, त्यामध्ये गोळा केलेले ओबीसी नेते सगळे म्हणाले, आम्ही कोयत्याने पाय तोडीत असतो. पण पाय तोडणारा अजून माझ्यापर्यंत आला नाही.
मुंडे बंधु-भगिनींवर निशाणा
तुम्हाला राज्यात किंग राहायचे आहे, जिल्ह्यात किंग राहायचं आहे, मग मराठ्यांना गोड बोला. तुमची जात एक झाली, आम्हाला आनंद झाला. पण, माझी जात एक झाली, मग तुमच्या का पोटात दुखायला लागलं. तुम्ही जातीवाद करणार, तुम्ही मतं मराठ्यांची घेणार, तुम्ही शिरुर, आष्टी, गेवराईजवळच्या पोरांना मारणार. पण, आमची शांतता आणि संयम आहे, म्हणजे आम्ही भीतोत असं तुम्हाला वाटतं का?, असे म्हणत मुंडें बंधु-भगिनींवर हल्लाबोल केला. आम्ही क्षत्रिय मराठा आहोत, आम्हाला वाटतं लहान भाऊ आहेत. पण, निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम राहा.. असं ते म्हणाले होते. आता, आपणही 2-3 महिने संयम धरु, विधानसभेला सगळेच पाडू. बीड जिल्ह्यात मराठ्यांवर अन्याय करणारा एकही निवडून येऊ द्यायचा नाही, असे आवाहनही मराठा समाजाला केले. आपल्या विचारांचा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्यांना विरोध करणारा चालणार नाही, असे म्हणत जरांगेंनी नाव न घेता पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल केला.
एका बुक्कीत दात पाडीन, असे म्हणत भुजबळांवर हल्लाबोल….
आमचा एकमेव विरोधक छगन भुजबळ आहे. बाकी ओबीसी नेत्यांना आम्ही विरोधक मानत नाही. कारण, छगन भुजबळ या सगळ्यांचा मुकादम आहे, असे म्हणत जरांगेंनी बीडमधूनही छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. तसेच, भुजबळांनी केलेल्या शेरोशायरीवरुन, एका बुक्कीत दात पाडीन, असे म्हणत भुजबळांवर हल्लाबोल केला. तसेच, छगन भुजबळ तुझ्या जे जे नादी लागले, त्यांना मराठ्यांनी खुटा ठोकलाय. छगन भुजबळ जातीवादाने पिछाडलेला माणूस आहे, मराठ्यांविरुद्ध जातीवाद पसरवणाऱ्या लोकांना यापुढे साथ द्यायची नाही. छगन भुजबळने सर्व ओबीसी नेते एकजूट केले आहेत. मराठ्यांनी आता एक व्हा, एकजूट राहा एवढीच विनंती मी तुम्हाला करतो, असे जरांगे यांनी म्हटले. सगळ्या पक्षातील मराठ्यांनी एकजूट व्हा, कारण सगळ्याच पक्षातील मराठ्यांना आरक्षण पाहिजे आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.