विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात , सायंकाळी निकाल , 12 उमेदवार रिंगणात, चुरशीची लढत…..

मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक होत असून यात 12 उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषेदत 12 जणांपैकी कोणाची गेम होणार आणि कोण गेमचेंजर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मते फुटू नयेत यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. क्रॉस व्होटिंग होऊन धक्कादायक निकाल लागू शकतो. या निवडणुकीची मतमोजणी सायंकाळी सुरू होणार आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पार पडेल.
भाजपने सर्वाधिक पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही दोन उमेदवार आहेत. तर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शेकापने प्रत्येकी एक उमेदवार मैदानात उतरवला आहे. भाजपने आमचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची तीन मते कमी आहेत. तर शिंदे सेनेचे 39 आमदार असून त्यांच्याकडे 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील.
शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिलाय. त्यांचे 15 आमदार आणि जयंत पाटील अशी मिळून 16 मते आहेत. त्यांना आणखी 7 मते लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 39 आमदार आहेत. त्यांचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे. यासाठी काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसची तीन मते असल्याचे सांगितले जात आहे. तर ठाकरे गटाकडे 15 आमदार असून त्यांना आणखी 8 मतांची गरज आहे. त्यांच्याकडे एक अपक्ष आहे.
काँग्रेसची मते कुणाकडे वळणार?
दरम्यान काँग्रेसने एकच उमेदवार मैदानात उतरवला असून त्यांच्याकडे 37 मते आहेत. प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 23 मतं लागणार आहेत. उरलेली 14 अतिरिक्त मते काँग्रेसकडे राहतील. ही मते कुणाला मिळणार यावर इतर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील असे शेकाप नेते जंयत पाटील यांनी म्हटले आहे . त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांची नजर असणार आहे.
पक्षीय बलाबल
भाजप 103+7 (अपक्षांचा पाठिंबा) =110 , शिवसेना 38+10 (अपक्षांचा पाठिंबा) =48, राष्ट्रवादी अजित पवार 40+3 (अपक्षांचा पाठिंबा) =43 महायुती 204
काँग्रेस 42, राष्ट्रवादी शरद पवार 12 , शिवेसना उद्धव ठाकरे 15 +1= 16 , महाविकास आघाडी 70,
विधान परिषदेसाठी कुणाचे किती उमेदवार?
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉक्टर परीणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, शिवसेना : कृपाल तुमाने, भावना गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार : जयंत पाटील, शेकाप ( पाठिंबा )