VidarbhaNewsupdate : अमरावतीमधून रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरही मैदानात…
अमरावती: रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून प्रकाश आंबेडकरांकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराबाबत वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकर या नावाला वलय आहे. त्यामुळे आंबेडकर जेव्हा निवडणुकीला उभे राहतात तेव्हा समाज त्यांच्या पाठिशी असतो. आंबेडकर कोणत्याही पक्षातर्फे उभे राहिले तरी फरक पडत नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे त्यामुळे अमरावतीची लोकसभा मतदारसंघाची लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले की, अमरावतीमधील सामान्य जनता, वेगळा विदर्भ संघटना आणि स्थानिक जनतेने आमच्या मतदारसंघात नवी चेहरा वेगळा विचार घेऊन येऊ शकतो, असे मला सांगितले. त्यासाठी मला तिकडच्या अनेक लोकांनी फोन केले. त्यांनी मला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची विनंती केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 2 मे रोजी मी अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता आनंदराज आंबेडकर मैदानात उतरल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी चर्चा आहे. याविषयी विचारले असता आनंदराज आंबेडकर यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. मला वंचितच्या कार्यकर्त्यांनीच अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली असून त्यानुसार मी या निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. .
दरम्यान आधीच नवनीत राणा , बच्चू कडू आणि अडसूळ यांच्यातील वादामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. भाजपने दोन दिवसांपूर्वीच अमरावतीमधून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्यावतीने दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानातून रिंगणात उतरवण्याची घोषणा केली होती. तसेच याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने अगोदरच उमेदवार जाहीर केला आहे. अशातच आता आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे त्यामुळे हि निवडणूक चुरशीची होणार आहे.