SocialMediaNewsUpdate : “तिने” मोदी शाह आणि भाजप नेत्यांची “टीम वसूली टायटन्स “ची पोस्ट टाकली , आणि सोशल मिडीयावर उसळली लाट … !!

नवी दिल्ली: महिला क्रिकेट संघातील आपल्या पराक्रमासाठी ओळखली जाणारी भारतीय क्रिकेटपटू पूजा वस्त्राकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेत्यांची खिल्ली उडवणारी ‘वसूली टायटन्स’ नावाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तथापि, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पोस्टवरून प्रतिक्रियांचे मोठे वादळ आल्याने वस्त्रकर यांनी पोस्ट हटविली आणि ही पोस्ट आपण केलीच नसल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. मात्र या दरम्यान ही पोस्ट तुफान व्हायरल झाली.
पूजा वस्त्राकरच्या इन्स्टाग्रामवर शुक्रवारी ‘वसुली टायटन्स’ नावाची पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि इतर भाजप नेत्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच ती डिलीट करण्यात आली. तरीही, युजर्सनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि आता पूजा वस्त्राकरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, पूजाने याबाबत माफीही मागितली आहे.
पूजा वस्त्राकरच्या अकाउंटवरून पोस्ट डिलीट केल्यानंतर आणखी एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यात लिहिले आहे, “माझ्या इन्स्टाग्रामवरून एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचे मला समजले आहे. माझ्याजवळ माझा फोन नसताना हे घडले. मला एवढेच सांगायचे आहे की या पोस्टशी माझा काहीही संबंध नाही. मी मनापासून पंतप्रधानांचा आदर करते. या फोटोमुळे भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागते.”
अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. अष्टपैलू पूजा ही उजव्या हाताची मध्यम वेगवान गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज आहे. तिने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
दरम्यान पोस्ट काढून टाकण्याच्या आधीच या विवादास्पद पोस्टचे स्क्रीनशॉट विविध सोशल मीडिया चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले, ज्यामुळे नेटिझन्सच्या प्रतिक्रियांची लाट आली. काहींनी या पोस्टचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणारा अर्थ लावला, तर काहींनी वस्त्रकर यांना अशी सामग्री शेअर केल्यामुळे तिच्या कारकिर्दीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल सावध केले.
https://twitter.com/error040290/status/1773719592356991019