Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हृदयद्रावक : होळीच्या पूर्वसंध्येला मोबाईल चार्जिंगच्या स्फोटात पेटले घर , ४ चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू !!

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये होळीच्या पूर्वसंध्येला मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एक दुर्घटना घडली. या घटनेत एक, दोन नाहीतर तब्बल ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी चार मुलांचा मृत्यू झाला असून पालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

शनिवारी पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत रात्री उशिरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना ज्या खोलीत घडली, तिथे एक इलेक्ट्रिकल बोर्ड होता आणि मोबाईल चार्जिंगला होता. अचानक इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या बाहेर आल्या. यानंतर ठिणगी पडल्याने बेडवरील फोमच्या गादीने पेट घेतला आणि आग लागली. पाहता पाहता आग संपूर्ण खोलीत पसरली आणि काही मिनिटांतच संपूर्ण खोली आगीच्या भक्ष्यस्थानी आली.

खोलीत आग लागली त्यावेळी पती-पत्नी आणि त्यांची मुले असे सहाजण खोलीत होते. दरम्यान आग लागल्याचे कळतच पती-पत्नीने आपल्या मुलांसह जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आग संपूर्ण खोलीत पसरली होती. त्यामुळे घरातील सर्वचजण होरपळले.

दरम्यान आगीची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेत, घरातील सर्वांना बाहेर काढून त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना मेरठच्या, लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.

मुझफ्फरनगरच्या जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या जॉनी यांच्या घरात ही घटना घडली. जॉनी हा रोजंदारीवर काम करतो. होळीच्या सुट्टीमुळे जॉनी शनिवारी घरीच होता आणि त्याची पत्नी बबिता स्वयंपाक करत होती. खोलीत त्याची मुलगी सारिका (10), निहारिका (8), मुलगा गोलू (6) आणि मुलगा कालू (5) हे खेळण्यात रमलेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान निहारिक आणि कालू या दोन्ही मुलांचा होरपळून घरातच मृत्यू झाला. तर दोन मुलांचा उपचारा दरम्यान रुग्णालयात जीव गेला. कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरू आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाईल चार्जिंगला असताना अचानक त्याचा स्फोट झाला. यानंतर संपूर्ण घर जळून खाक झालं. आगीत पालक आणि चार मुले होरपळून निघाली. परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर घराला आग लागली. यानंतर सर्वांनी एकमेकांना वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली, पण तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!