MahaVikasAghadi News Update : शरद पवार यांची संभाव्य नावे ठरली, शिवसेनेच्या यादीची प्रतीक्षा…

मुंबई : माहविकास आघाडीच्या जागांचा गुंता मोठ्या प्रमाणात सुटला आहे. या जागा वाटपानुसार काँग्रेसने तिसऱ्या 57 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील 7 जागा घोषित केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सत संभाव्य उमेदवार ठरवले असल्याचे वृत्त आहे. यातील माढ्याची जागा महादेव जानकर यांना सोडण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान सांगलीच्या जागेवरील हक्क शिवसेना सोडण्यास तयार नसल्याने काँग्रेसची अडचण कायम आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या यादीमध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे. यानुसार बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर तिकडे शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असू शकतात.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेचा उमदेवार जाहीर केला आहे. कोल्हापूरची सीटिंग जागा काँग्रेसला सोडल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. त्यानुसार सांगलीतून उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेसची 7 जणांची यादी
काँग्रेसने महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी 21 मार्चला जाहीर केली. यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमध्ये शाहू महाराज, लातूरमधून शिवाजीराव कळगे, नंदुरबारमधून गोवळ पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे आणि अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.