MVA NewsUpdate : उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक , प्रकाश आंबेडकर यांचीही उपस्थिती…

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने २० उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही अनौपचारिकपणे काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असली तरी अद्याप काही जागांवरचा तिढा कायम आहे. उद्याच्या जागा वाटपाच्या महाविकास आघाडीच्या अंतिम बैठकीत आघाडीचा तिढा सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीही उपस्थिती असणार आहे.
दरम्यान आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी २३, काँग्रेसने १८ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० जागांवर दावा केला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही ५ जागांची मागणी केली आहे. दरम्यान २१ मार्चला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपाची अंतिम चर्चा होऊन फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीत १५ जागांवर तिढा कायम असून यामध्ये सोलापूरच्या जागेचा समावेश आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर केला. त्याच पद्धतीने वंचितने सोलापूरच्या जागेवर दावा केला असला तरी तेथे काँग्रेसने प्रणिती शिंदे यांचे नाव फायनल केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसची बैठक संपन्न
दरम्यान आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री पी.एल. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
या बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती असून त्यात नागपूर – विकास ठाकरे , नांदेड – वसंत चव्हाण, लातूर – शिवाजी काळगे, नंदुरबार – के.सी.पाडवी, गडचिरोली – नामदेव उसेंडी, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती, सोलापूर – प्रणिती शिंदे , पुणे – रविंद्र धंगेकर आणि अमरावती – बळवंत वानखेडे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या उमेदवारांबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणत्याही क्षणी आम्ही उमेदवारांची घोषणा करू, असे के. सी. वेणूगोपाल यांनी म्हटले आहे.