Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर पुन्हा हल्ला बोल , देवेंद्र फडणवीस यांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची…

Spread the love

लातूर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज लातूरच्या निलंगा येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडवणीस यांनी अशीच दडपशाही सुरू ठेवली तर पुन्हा एकदा 6 करोड मराठ्यांनी एकत्र यायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची”, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला या सभेत केले .

“मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली होती. मराठा समाजाच्या नोंदीचा आकडा 63 लाखांपर्यंत गेला आहे. त्याचा फायदा सव्वा करोड मराठ्यांना झाला. मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि तेही ओबीसीतून. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण भेटणार होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकले. मी त्यांच्या विरोधात कधी बोललो नाही. मराठा समाज 10 टक्के मागास सिद्ध झाला तर मराठा समाज आरक्षणात का घेतला नाही? ही आमची मागणी नाही. तुम्ही 10 टक्के आरक्षणाचा घाट घातला. मराठा समाज 27 टक्के आरक्षणात का घेतला नाही? 2018 ला देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकला आणि 13 टक्के आरक्षण दिले. मराठ्यांनी उपकार ठेवले आणि 106 आमदार निवडून दिले. पण ते आरक्षण रद्द झाल्याने अनेक मुले निवड होऊन रडत आहेत”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

“मी अगोदर सांगत होतो. ते आरक्षण टिकणार नाही. फडवणीस यांनी एक दगडात दोन पक्षी मारले. आता दिलेल्या आरक्षणावर मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. यांना वाटले या 10 टक्के आरक्षणामुळे मराठे खुश होतील. माझ्यावर मग दबाव आणला गेला. मला 10 टक्के आरक्षण घ्यावे असे मी सांगावे. मी करोडो मराठ्यांचे वाटोळे करू शकत नाही. मी सत्ता आणि मराठामधील काटा आहे. पण मी निष्ठावंत आहे. माझे इकडे ठरले तर त्यांना माहीत होते. पण मला त्यांच्याकडे काय ठरते ते माहीत होते. आमचेही काही माणसे त्यांनी फोडले आहेत”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

‘तुमची ढेरी कमी होईल’

“आपल्याला आता हे अंगावर घ्यावे लागेल. झालेल्या गोष्टीचा हिशोब होणार. मग मीच निघालो सागर बंगल्यावर. मला म्हणाले या आणि सागर बंगल्याचे दार लावून घेतले. त्यांनी अर्थसंकल्प अधिवेशन बोलावले आणि त्यात मला अटक करा हाच धिंगाणा. 17 दिवस पोटात अन्न नव्हते. चीडचीड होते, पण मी माफी मागितली. जातीकडून नाही तर पक्षाकडून जातात. फडवणीस यांनी माझ्यासोबत आठ दिवस उपोषण करावं. तुमची ढेरी कमी होईल”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“फडवणीस साहेब तुम्हाला उपोषण कळणार नाही. अंतरवलीमध्ये आमच्या आई-बहिणीच्या डोक्याची चिंधड्या झाल्या. त्यांच्यामध्ये आई नाही दिसली का? फडवणीस तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागणार आहे. मी माझी राखरांगोळी करतो नाही तर पुढच्याची करतो. एसआयटी कुणावर असते? देशात पहिल्यांदा आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावली”, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांचा गिरीश महाजनांना टोला

“माझ्या घरावर 13 पत्रे आहेत ते नेतू का नागपूरला? ज्यांच्याकडे मोटार सायकल नव्हती ते दीड करोड रुपयांच्या गाडीत फिरतात. तो एक डबडा गिरीश महाजन म्हणतो आम्ही त्याचे खूप लाड केले. 15 रुपयांचा बेल्ट आणून चड्डी वर करीत हिंडते”, अशी खोचक टीका मनोज जरांगे यांनी केली. “जामनेरचे सर्व मराठे फुटले आहेत. तुमच्याकडचा आमदार मस्ती करतो. माझ्या जाती विरोधात बोलतो”, असे म्हणत त्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांनाही टोला लगावला.

‘…तर हे लफडं पोहचलं गृहमंत्रीपर्यंत’

“माझ्या जातीचे आज वाटोळे झाले आहे. तुम्हाला माझी विनंती आहे. तुमच्याकडे मराठा नेत्याला समजून सांगा. मराठ्यांच्या पोरानं आरक्षण मिळणार आहे, आणि ऐकत नसतील तर त्यांच्या अंगावार गुलाल पडू देऊ नका. जेव्हा जातीचे काम होते तेव्हा नाही आला. आता तुझे काम पडते म्हणून आणि हे सर्व महाराष्ट्रमध्ये करा. आता चलो मराठाचे बोर्ड काढत आहेत आणि हे पोलीस अधिकाऱ्यांना विचारले तर हे लफडं पोहचलं गृहमंत्रीपर्यंत”, असं जरांगे म्हणाले.

‘फडणवीसांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची’

“जेसीबीवरून फुले टाकली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फुले पडली नाहीत. त्याला आम्ही काय करावे? एसआयटी नेमली पण अजून आली नाही कुठे हिंडती? देवेंद्र फडवणीस यांनी अशीच दडपशाही सुरू ठेवली तर पुन्हा एकदा 6 करोड मराठ्यांनी एकत्र यायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!