बीसीसीआयची मोठी कारवाई ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला वार्षिक करार यादीतून बाहेर
बीसीसीआयने मोठी कारवाई करत ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करार यादीतून काढून टाकले आहे. सतत इशारे देऊनही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केले. आता हे दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत नाहीत.
बीसीसीआयने केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंची नवी यादी जाहीर केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय रवींद्र जडेजालाही A+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
या खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी रुपये मानधन दिले जाते. 6 खेळाडूंना ए ग्रेडमध्ये, 5 खेळाडूंना बी ग्रेडमध्ये, तर 15 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.
धरसोड वृत्तीमुळे बीसीसीआय संतापले
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या धरसोड वृत्तीमुळे बीसीसीआय संतापले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर किशनला सातत्याने रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.
पण किशनने बीसीसीआयकडे दुर्लक्ष केले आणि त्याने झारखंडच्या एकाही रणजी सामन्यात भाग घेतला नाही. राष्ट्रीय कर्तव्यावर नसलेल्या सर्व खेळाडूंना रणजी स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
श्रेयस अय्यर तर वेगळ्याच वादात अडकला. खराब कामगिरीमुळे अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. रणजी ट्रॉफी न खेळण्यासाठी अय्यरने दुखापतीचे कारण पुढे केले.
मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अय्यरचा खोटारडेपणा उघड केला. एनसीएने स्पष्ट केले की, अय्यर फिट आहे आणि त्याला खेळण्यात कोणतीही अडचण नाही.
केंद्रीय करारातून बाहेर पडल्यानंतर आता टीम इंडियातील अय्यर आणि किशनचे भवितव्यही धोक्यात आले आहे. ज्या खेळाडूंना खेळण्याची भूक नाही, अशा खेळाडूंवर संघ व्यवस्थापन आपला वेळ वाया घालवणार नाही, असे रोहित शर्माने नुकतेच स्पष्ट केले आहे. या दोन खेळाडूंवर कारवाई करून बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटकडे कोणत्याही किंमतीवर दुर्लक्ष करता येणार नाही, असा संदेशही दिला आहे.
A+ श्रेणीत समाविष्ट खेळाडू : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
अ श्रेणीत समाविष्ट खेळाडू : आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या
ब श्रेणीत समाविष्ट खेळाडू : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
क श्रेणीत समाविष्ट असलेले खेळाडू : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765