MaharashtraPoliticalNewsUpdate : प्रकाश आंबेडकर – शरद पवार यांची पुण्यात भेट झाल्याची चर्चा …

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली असल्याचे वृत्त आहे. शनिवारी रात्री पुण्यातील शरद पवार राहत असलेल्या मोदी बाग या सोसायटीत ही भेट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रकाश आंबेडकर यांनी पवारांसोबत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत प्रवेश मिळावा म्हणून शरद पवार आणि सेनेचे नेते उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. स्वतः शरद पवार यांनी स्वतः ही माहिती माध्यमांना एका प्रश्नाच्या उत्तरात दिली होती . त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याच्या वृत्ताने चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडीया आघाडीत जाण्यास इच्छुक असून शरद पवारांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वी या दोन नेत्यांची मुंबईतही भेट झाली होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे शनिवारी रात्री पुण्यातील शरद पवार रहात असलेल्या मोदी बाग या सोसायटीत आले. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी मोदी बाग या सोसायटीत राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आपण आल्याच स्पष्ट केले. या दरम्यान शरद पवारांची आणि आपली भेट झाल्याचा त्यांनी इन्कार केला आहे.
समान जागा वाटपाचा फॉर्म्युला…
दरम्यान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे असं सांगत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांची समान विभागणी करावी. प्रत्येकी १२ जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.