Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PrakashAmbedkarNewsUpdate : “…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही…” प्रकाश आंबेडकर यांचा विरोधकांना भीम टोला… नागपुरात ‘वंचित’चे जोरदार शक्तिप्रदर्शन

Spread the love

नागपूर: “मोदी घालवायचा असेल तर २-४ जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”, असा भीम टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या मनुस्मृती दहन दिनानिमित्त आयोजित स्त्री मुक्ती दिन परिषदेत बोलताना लगावला.

यावेळी बोलताना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आंबेडकर म्हणाले की , ‘वंचितच्या उमेदवारांनी इतर कोणत्याही गोष्टींचा फारसा विचार न करता केवळ लोकसभा निवडणूकीत विजय कसा मिळवता येईल याचाच विचार करावा. जागा वाटप, किती जागांवर लढणार याची चर्चा करण्यापेक्षा उमेदवारांनी त्यांना निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी प्रयत्न करावा. मग मते पैसे मोजून घ्यावी लागली, मैत्री करून मिळवावी लागली तरी चालतील. पण, जास्तीत जास्त मते मिळतील यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न करावे. येणाऱ्या काळात जर फुले-शाहू-आंबेडकरवाद ही विचारसरणी लोकसभेत पोहचवायची असेल तर निवडणूक जिंकण्याची खुणगाठ बांधा’ असा सल्ला आंबेडकर यांनी यावेळी दिला.

एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी…

इंडिया आघाडीत आपण एकत्र लढलो तर स्वागतच आहे. जो कोणी उमेदवार असेल ती जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी खूणगाठ मनाशी बांधा, ज्या पक्षाला पाठिंबा दिला असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान ५०० मते मिळालीच पाहिजे. यासाठी वाट्टेल ते करा, मीच उमेदवार आहे असे समजून निवडणुकीसाठी सज्ज राहा, एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

सध्या इंडिया आघाडीचा भाग नसलेले आंबेडकर यांनी यावेळी इंडिया आघाडी सोबत जाण्याची तयारी असल्याचे सुतोवाच करताना, ‘मोदीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडियाची स्थापना केली. मात्र, अजूनही ते पूर्णपणे एकत्र आलेले नाही. मी यापूर्वीही म्हटले आहे, मोदीला घालवायचे असेल तर आधी एकत्र या, कसे लढायचे यासाठी आम्ही आमचा भेजा देतो … असे सांगत इंडियासोबत जाण्याचे संकेत दिले. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना आम्ही यांना सर्वप्रकारची मदत करायला तयार आहे. मात्र हे लोक आम्हालाच नुकसान पोहचवत असल्याची टीका करून , मोदीला पुन्हा देशावर राज्य करू द्यायचे नसेल तर सर्वांनी एकत्र येणे, संघठित होऊन लढणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्याची लोकसभा ही फुले – शाहू – आंबेडकरवादी विचारांनी चालली पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यासाठी जे करायचं आहे ते करण्यासाठीं सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे.सुरक्षा ही व्यक्तिगत नसते तर व्यवस्थेत असते. व्यवस्था टिकली तर आपण टिकतो. म्हणून ही व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील जागा कमी करुन निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी…

आंबेडकर पुढे म्हणाले की , जागा वाटपाचा विषय गांभीर्याने घेण्यापेक्षा मोदींविरोधात लढा उभा करायला हवा, कोणी म्हणतंय मी २३ जागा लढेन, कोणी म्हणतंय अमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे. मार्च -एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करुन निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी. अन्यथा केंद्रात पुन्हा मोदींचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.

तर देशात पुन्हा प्रतिक्रांती होईल…

आरक्षणाच्या नावाखाली राज्यात मराठा-ओबीसी व धनगर – आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला जात आहे. सध्या देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे आणि ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरू आहे. यातून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे. ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ काही गोष्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चुकल्या तशा नागपूरकरांच्याही चुकल्या आहेत. घाबरता कशाला, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. ती पुन्हा जिवंत होऊ द्यायची नसेल तर संसदेवर ताबा मिळवा. आपल्या विचारांचा पराभव झाला तर देशात पुन्हा प्रतिक्रांती होईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही खुले आव्हान !

मोहन भागवत यांना खुले आव्हान देताना आंबेडकर म्हणाले , आरएसएसवाल्यांना हिंदूंना एकत्रित करण्याचा एक कार्यक्रम देतो तो म्हणजे, एक हिंदू धर्मशास्त्राचे विद्यापीठ उभ करायचं जे धर्माशिवाय दुसरं काय करणार नाही. आणि एक कायदा करायचा की, हिंदू पुजारी हा त्या विद्यापीठातील पदवीधर असायला हवा. तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. हा माझा सल्ला आहे. हा मान्य केला तर मी तुम्हाला हाथ देईल असे आव्हान त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना केले आहे.

नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला ते म्हणाले की, मोहन भागवत माझा तुम्हाला सवाल आहे की, मिलिटरीच्या ८० गाड्यांचा ताफा होता, मिलीट्रीच्या गाड्या १० च्यावर जात नाही आणि जेव्हा याच्यावरती त्या जातात बॉम्बस्फोट झाला तरी जवान वाचावेत म्हणून त्यांना डबल पॅक केलं जात. मग जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली तिला डबल पॅक केलं होतं का? याचा खुलासा करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी मोहन भागवत आणि आरएसएस यांना केले दिले आहे. नरेंद्र मोदींच्या ५६ इंच छातीत गाठया आणि ढोकळेच आहेत बाकी काही नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

परिषदेतील महत्वाचे ठराव…

या परिषदेत २५ डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा, महिला आरक्षणात ओबीसी, मुस्लीम महिलांना आरक्षण देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, -मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी, बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून आरक्षण जाहीर आदी ठराव पारित करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, महासचिव अरुंधती क्षीरसाट, प्रदेश उपाध्यक्षा निशा शेंडे आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सुजात आंबेडकर, शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्यासह जिल्हा अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जोरदार शक्ती प्रदर्शन…

स्त्रीमुक्ती परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपचा गड असलेल्या नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला मोठे यश आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी राज्यात महाविकास आघाडीत व केंद्रात ‘इंडिया’ आघाडीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवत ‘वंचित’ला सोबत घ्यावे असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले होते.

सभेच्या वेळी झाली दुर्घटना…

दरम्यान, नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची आज ‘स्त्री मुक्तीदिन परिषद’ आयोजित करण्यात आली असून ही सभा सुरू होण्यापूर्वीच सभा मंचाच्या मागील बॅनर असलेला पिलर कोसळला. त्यामुळे मंचावरील मागच्या बाजूला असलेले बॅनर खाली पडले होते. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी नाही. या स्त्रीमुक्ती परिषदेसाठी सभास्थळी भव्य ‘बॅकड्रॉप’ उभारण्यात आला होता.

दोन दिवसांपासून व्यासपीठ उभारणीचे काम सुरू होते. असे असताना प्रकाश आंबेडकर यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वीच ‘बॅकड्राप’ काही भाग लोखंडी अँगलसह कोसळला. त्यामुळे काही वेळेसाठी तारांबळ उडाली. ही घटना घडली तेंव्हा सुजात आंबेडकर हे तातडीने व्यासपीठाजवळ आले व त्यांनी कोसळलेल्या ‘बॅकड्रॉप’ बाबत माहिती घेत त्यांनी कार्यकर्त्यांना मदत करीत कोसळलेले साहित्य बाजूला केले. अपघाताने घडलेला हा प्रसंग वगळला तर ‘वंचित’ची नागपुरात स्त्रीमुक्ती परिषद प्रचंड यशस्वी ठरली. या परिषदेसाठी राज्यभरातून महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्त्रीमुक्ती व मनुस्मृतीबाबत फलक हाती घेतलेल्या बालिकांनीही सभास्थळी उपस्थितांचे लक्ष वेधले.

दुपारच्या पत्रकार परिषदेत केला हा गौप्यस्फोट…

दरम्यान दुपारच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची फिप्टी फिप्टी जागा लढवण्याची अंडरस्टँडिंग झाली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेले सिक्रेट पत्रकारांसोबत त्यांनी यावेळी शेअर केले. “उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे.

शिवसेना आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने ५०-५० जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे. म्हणजे लोकसभेच्या २४ जागा उद्धव ठाकरे आणि २४ जागा आम्ही लढणार. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचं काहीच झालं नाही तर मग आम्ही फिफ्टी-फिफ्टी लढू. त्यांचं जागा वाटप ठरलं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो. काहीच झालं नाही आणि सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागले. आम्हीही ४८ जागा लढवू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी आमची शून्य चर्चा आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कसलीही चर्चा नाही. आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी पत्र पाठवले होते मात्र त्यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. टिल्लू पिल्लू यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या काही नेत्यांवर देखील यावेळी बोलताना टीका केली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!