Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UddhavThackerayNewsUpdate : दम असेल तर एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचले , निवडणूक आयोगावरही साधला निशाणा ….

Spread the love

मुंबई : तुमची एवढी लाट आहे, तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. म्हणजे आमच्या मनात शंका नको. सगळे वातावरण विरोधात असताना आणि एक्झिट पोल जे येत होते, ते उलटे-पालटे करणारे निकाल लागत असताना, हे कसे घडले, असा प्रश्न मतदाराला पडणार असेल तर त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी दम असेल तर एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे जाहीर आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत निवाडणूक आयोगावरही निशाणा साधला.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नुकत्याच आलेल्या पाच राज्यातील निकालाविषयी भाष्य करताना तीन राज्यात भाजपला मिळालेल्या विजयाबाबत शंका उपस्थित केली. तसेच शिवसेना  फोडायचा कितीही प्रयत्न केला, तिला किंवा प्रशासनातून बाजूला काढायचा प्रयत्न केला, तरी आम्ही शांत राहणार नाही. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. भाजपला भरघोस यश मिळाले. माझे आव्हान आहे की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या. ही निवडणूक वर्ष ते दीड वर्षे पुढे ढकलली आहे. सिनेटची निवडणूक लांबवली जात आहे, अशी टीका केली.

लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी

दरम्यान लोकसभा ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर मतमोजणीसाठी वेळ लागेल हे मान्य आहे. मात्र, स्थानिक निवडणुका ज्या पद्धतीने लांबवल्या जात आहेत, त्यापुढे मतमोजणीसाठी लागणारा विलंब काहीच नाही. मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवस लागले तर काय फरक पडतो. तुमच्यात एवढा आत्मविश्वास असेल आणि हिंमत असेल तर उद्या होणारी लोकसभेची एकच निवडणूक देशभरात बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिले आहे. तसेच ते नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हा विषय मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे आणि हा फास तोडल्याशिवाय शिवसेना गप्प राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, शिवसेना प्रशासनात नाही, त्यामुळे मोकळे रान मिळाले, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना करणार आहे. त्यासाठी १६ डिसेंबर रोजी धारावी ते अदानी ग्रुपच्या कार्यालयावर विराट मोर्चा नेला जाणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका …

यावेळी ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडले ते म्हणाले की ,   “विधानसभा निवडणुकीत जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन मी केलं आहे. मात्र निवडणुकीत देवाच्या आणि धर्माच्या नावाने मतं मागणं हा गुन्हा आहे का? असा प्रश्न विचारत मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. उदाहरणासह मी त्यात विविध गोष्टी नमूद केल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग बलीच्या नावाने मते मागितली. आता मध्य प्रदेशच्या निवडणुकीत अमित शहा यांनी मतदारांना विजयी झाल्यास रामलल्लाच्या दर्शनाला घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं, याचाही उल्लेख मी पत्रात केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात निवडणूक काळात हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याने निवडणूक आयोगाने त्यांना ६ वर्ष निवडणूक लढवण्यास बंद घातली होती. एवढंच काय पण त्यांचा मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला होता. मग आता जे सुरूय त्याचं काय? या पत्राला निवडणूक आयोगाकडून अद्याप उत्तर देण्यात आलेलं नाही.

याचा अर्थ निवडणुकीत देवाचे आणि धर्माचे नाव वापरण्यास तुमची हरकत नाही, असा अर्थ आम्ही घेऊ आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया अशा आमच्या देवांची नावे घेऊ,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सरकार आपल्या दारी या नावाखाली जो बोगसपणा…

राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकार आपल्या दारी या नावाखाली जो बोगसपणा सुरू होता, तो आता बंद पडला आहे. कारण लोक त्याकडे बघतही नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांपर्यंतचं पीककर्ज माफ केलं होतं. करोना काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. सरकारने आता भुलभुलैय्या न करता तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी आमची मागणी आहे.”

दरम्यान, “जिथंजिथं शेतकरी संकटात आहे, तिथं शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!