Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanNewsUpdate : मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा ….

Spread the love

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मानोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत.  कालच्या जालना  येथील विराट सभेनंतर ते आज औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड दौऱ्यावर आहेत . या दौऱ्यात आज करमाडमध्ये जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली .

आपल्या दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना , “मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असे  सरकारने म्हटले होते. पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणे सरकारला तेवढे सोपे  जाणार नाही. मला अटक करायची असेल तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल,” अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.

मराठा आंदोलकांच्या अटकेबाबत मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, की आंदोलकांची अटक थांबवा. बीडमध्ये जे घडलं ते सत्य आहे. त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकलं आहे. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत. काही पोलिसांची जात उफाळून आली आहे. पोलिसांना कोणतीही जात नसते आणि नसायलाही पाहिजे. तरच राज्य शांत चालू शकतं. लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला नाही पाहिजे. पोलीस हा आपला मित्र आहे. पोलीस आपल्याला आधार देणारा आहे. जातीय द्वेष करणार नाही, अशी भावना पाहिजे.”

“माजलगावमध्ये हे सर्रास सुरू आहे. तिथे पोलिसांकडून लोकांबरोबर जातीवाद केला जातोय, हे व्हायला नाही पाहिजे. तेथील आमदारांच्या सांगण्यावरून कारवाया करायच्या, हे चांगलं नाही. उद्या त्यांना मराठ्यांच्याच दारात यायचं आहे. हे सगळं सरकार करत नसेल, तर सरकारने हे थांबवायला हवं. कारण गृहमंत्र्यापेक्षा कोणताही पोलीस मोठा असूच शकत नाही. गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. मग तुम्ही आमच्या लोकांना अटक का करत आहात? आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असं आश्वासन सरकारने दिलं होतं. उपोषण सोडून एक महिना झाला, पण सरकार काहीच करू शकलं नाही. याचा अर्थ तुम्ही आमच्यावर कोणता डाव टाकला आहे. तुमचे डाव तुम्हाला परवडणार नाहीत. आम्ही अटक होऊ, तुरुंगात जाऊन बाहेर येऊ पण पुढचे डाव सरकारसाठी अवघड जातील. याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा,” असंही मनोज जरांगे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!