Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार गटाचा निवडणूक आयोगासमोरील युक्तिवाद पूर्ण , पुढील सुनावणी शुक्रवारी ..

Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक आयोगासमोर खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबत सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले. त्यात शरद पवार गटाचे नेते असलेल्या प्रताप सिंह चौधरी यांच्या नावाचे खोटे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने सादर केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. प्रताप सिंह चौधरी यांना शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर उभे केले.अजित पवार गटाने केलेल्या फसवणूक आणि खोटी प्रमाणपत्रे यावरून निवडणूक आयोगाने फौजदारी खटला न्यायालयात दाखल करावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली.

या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आज निवडणूक आयोगासमोर माझा युक्तिवाद पूर्ण झाला. आता विरुद्ध पक्षकाराचा युक्तिवाद सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आजच्या माझ्या युक्तिवादात अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर हजारो बोगस प्रतिज्ञापत्रे, दस्तावेज दाखल करण्यात आल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. यात अजित पवार गटाने २४ प्रकारचे फ्रॉड केले असून त्यात कोणी मृत व्यक्ती आणि अल्पवयीन मुले आहेत.

प्रताप सिंह चौधरी यांचे खोटे प्रतिज्ञपत्र

शिवाय झोमॅटोत काम करणाऱ्यांचेही प्रतिज्ञापत्रे आयोगाला दिले आहेत. शिवाय आज आम्ही विचित्र प्रसंग समोर ठेवला. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असतानाच २७ ऑक्टोबरला अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्रे दाखल केलेत. त्यात आमच्यासोबत असणारे प्रताप सिंह चौधरी यांनी अजित पवारांचे समर्थन केल्याचे दाखवले. चौधरी यांना हे माहितीच नव्हते. त्यांना कळाले तेव्हा धक्का बसला. आज आम्ही प्रताप सिंह चौधरी यांचे प्रतिज्ञपत्र दाखल केले त्याचसोबत त्यांना आयोगसमोर उभे केले. चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापनेपासूनचे सदस्य आहेत. त्यांना न कळवताच त्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले असा आरोप आज करण्यात आला.

९ हजार प्रतिज्ञापत्रे सादर

दरम्यान आम्ही प्राथमिक स्वरुपात केवळ ९ हजार प्रतिज्ञापत्रे सादर केले आहेत. खोट्या दस्तावेज प्रकरणात निवडणूक आयोगाला अधिकार आहे की , अशा प्रकरणात फौजदारी कारवाई न्यायालयासमोर न्यावी. हा एक प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा आहे. खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे दाखल करणे हा गुन्हा आहे.आम्ही अजित पवार गटाचा पर्दाफाश केला आहे.

न्यायाचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्रे सादर केलीत. परंतु त्यात एकही प्रतिज्ञापत्र असे नाही ज्यात शरद पवारांविरोधात काही लिहिले. अजित पवारांना मी नेता मानतो असं प्रतिज्ञापत्र आहेत. परंतु शरद पवारांच्या विरोधात मी अजित पवार गटाचे समर्थन करते असे लिहिलेले नाही. कुठल्याही प्रतिज्ञापत्रात असे काही लिहिले नाही. खोटी आणि दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्रे घेतली आहे असेही अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले.

आम्ही पोलीस तक्रारही दाखल करू

दरम्यान, तुम्ही खोट्या प्रतिज्ञापत्रावर स्वत:चा पक्ष उभा करताय त्यावर तुमची नितिमत्ता दिसून येते.अजित पवार गटाचे देवदत्त कामत यांनी ३१ ते ५ जुलै दरम्यान कधीही संबंधित नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतले नाही असे निवडणूक आयोगासमोर आणले. खोटे कागदपत्रे दाखल करणे गुन्हा आहे. प्रताप सिंह चौधरी यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल आम्ही पोलीस तक्रारही दाखल करू असे पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!