SharadPawarNewsUpdate : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? अखेर पवारांनी दिले झणझणीत उत्तर …!!
नाशिक : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? असा सातत्याने प्रश्न विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी अखेर उत्तर दिले आहे. काल बुधवारी मोदींनी मुंबईत रोड शो घेतला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पार पडले असून राजकीय आखाडा तापलेला आहे. महाराष्ट्रातील अंतिम, पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी, २० तारखेला पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा पार पडला. आधी नाशिक आणि कल्याणमध्ये त्यांची सभा झाली, त्यानंतर मुंबईत त्यांचा भव्यदिव्य रोड शो पार पडला. या रोड शो वरूनही शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.
शरद पवार यांनी कांद्यासाठी काय केले , असे मोदी म्हणाले. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की , मोदी नेहमीच मी काय केले ? असे विचारतात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या राज्यातील शेतीचा कोणताही विषय असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकदा असं झालं की मी इस्त्राइलला जात होतो आणि मोदींनी मला फोन केला. कारण त्यांचा व्हिसा नाकारला जात होता. त्यांनी सांगितलं मला ईस्त्राइलला येऊन सर्व अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावेळी मी त्यांना घेऊन गेलो होतो. ईस्त्राइलचं शेती तंत्रज्ञान सर्व गोष्टी त्यांना चार दिवस दाखवल्या. हे सगळं माहित असताना मोदी मी काय केले असे बोलतात म्हणजे ते फक्त राजकारण करत आहेत.
नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गेलेला आहे….
नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. त्यामुळे ते जाती धर्मावर बोलतात. मुख्यमंत्री असताना त्यांना शेतीचे प्रश्न पडायचे आता त्यांना पडत नाहीत. आता त्यांना राजकारणात रस आहे, असे शरद पवार म्हणाले. मी राज्यभरात फिरत आहे. मला महाविकास आघाडीसाठी अनुकूल ट्रेंड आहे. लोक बदलासाठी तयार आहेत. भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, हे मत विशेषत: शेतकरी वर्गाचे आहे. जनमत भाजपसोबत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवार म्हणाले, धुळे, नाशिक, सातरा भागात कांद्याचे प्रश्न आहेत. मोदी येतात मात्र शेतीच्या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. मोदी फक्त राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करतात. मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं. त्यांनी कार्यक्रम घेतला तो गुजराती परिसर आहे. त्यांचं लक्ष फक्त एका वर्गाकडे होतं. लोकांना खूप त्रास झाल्याचे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधांनांना प्रश्न विचारणाराचे कौतुक
दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना शेतकऱ्याने कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्याकडून कांद्यावर बोला, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी किरण सानप या तरुणाला ताब्यात घेतले. नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचे समोर आले आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. किरण सानप हा गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहे.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकर्यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे. या शब्दात शरद पवार यांनी मोदींना कांद्यावर बोला हे विचारणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.