Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

India vs New Zealand : शानदार ऐतिहासिक विजय, असा झाला रोमहर्षक सामना…

Spread the love
  • मुंबई: तब्बल चार वर्षानंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमान भारताने वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून शानदार विजय प्राप्त करीत इतिहास घडवला आहे. गेल्या वेळी २०१९ मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी भारताने न्यूझीलंडला हरवून मागील पराभवाचा बदला घेतला. आता भारतीय संघ १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.

आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ सर्व विकेट्स गमावून केवळ ३२७ धावा करू शकला.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांत ऑलआऊट झाला आणि सामना ७० धावांनी गमावला.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुबमन गिलने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.

मागील इतिहास पाहता 2011 च्या वर्ल्डकप पटकावल्यानंतर 2015 आणि 2019 अशा दोन वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलला टीम इंडियाला झटका बसल्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलच्या महामुकाबल्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी करताना चारशेच्या घरातील डोंगर रचल्यानंतर न्यूझीलंडने सुद्धा टीम इंडियाची दोन विकेट लवकर गमावूनही हवा काढली होती. मात्र, पुन्हा एकदा मोहम्मद शमी टीम इंडियासाठी धावून आला आणि 33 व्या षटकामध्ये घेतलेल्या दोन विकेटमुळे न्यूझीलंड जो एकेकाळी भक्कम वाटत जातो पूर्णतः कोलमडून गेला आणि त्यानंतर टीम इंडियाने जी मॅचवर पकड मिळवली ती शेवटपर्यंत सोडली नाही.

त्यानंतर बुमराह आणि कुलदीपने सुद्धा एकेक विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले त्यानंतर एका बाजूने किल्ला लढवत असलेल्या मिशेलला सुद्धा शमीनेच बाद करत न्यूझीलंडच्या उरल्यासुटल्या अशा सुद्धा संपुष्टात आणल्या. त्यामुळे टीम इंडिया तब्बल 12 वर्षांनी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. टीम इंडियाला 2015 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा न्यूझीलंडकडून टीम इंडियाला सेमी फायनलमध्येच पराभव स्वीकाराला लागला होता. जो धोनी रन आउट झाला होता तो वेदनादायी क्षण आजही क्रिकेटच्या कोट्यवधी चाहत्यांना आठवतो. मात्र त्या सर्वाची आज परतफेड जवळपास केली आहे. टीम इंडियाची आजची कामगिरी ही निश्चितच फायनलमध्ये जो कोणी येईल त्यांना धडकी भरवणारा असेल या शंका नाही.

या सामन्यात ज्या पद्धतीने टॉप फाईव्ह फलंदाजांनी बॅटिंग केली आहे त्याला तोडीस तोड गोलंदाजांनीही आपली कमाल दाखवली. त्यामुळे एकंदरीत टीम इंडियाच्या रॉकस्टार परफॉर्मन्समुळे टीम इंडिया आता फायनलमध्ये जवळपास निश्चित झाली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!