Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GramPanchayatElectionNewsUpdate : राज्यात ग्राम पंचायत निवडणूक , २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी सुरु आहे मतदान…

Spread the love

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घालू नये म्हणून सर्वत्र तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी होईल. तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

ग्रामपंचायतीसाठी नेत्यांचे  मतदान

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात अजित पवारांचे कुटुंब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. सुनेत्रा पवार सकाळी 7.30 वाजता काटेवाडीत मतदान करतील. स्वःत अजित पवार मात्र तब्येत ठीक नसल्यानं मतदानाला येणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात निरगुडसर गावात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील मतदान करणार आहेत. तर खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव गावात अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते मतदान करतील. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतीत मतदान असुनही तब्येतीच्या कारणास्तव खासदार अमोल कोल्हे मतदान करणार नसल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त जळगावात मंत्री गुलाबराव पाटील पाळधी खुर्द गावात मतदान करणार आहेत, तर पंढरपुरातील सांगोल्यात महूद गावात शहाजी बापू पाटील मतदान करतील

पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. त्याच प्रमाणे, महाविकास आघाडी काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्यात मतदान चालू …

औरंगाबाद जिल्ह्यात देखील १६ सार्वत्रिक तर २८ ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान चालू आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे.९ तालुक्यातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात १६ सार्वत्रिक तर २८ ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. या दोन्ही निवडणुकीच्या सरपंच पदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २९४ उमेदवार रिंगणात उतरले आहे. तर एकही ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नाही.

नगरपालिका, महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट

दरम्यान न्यायालयीन स्थगितीमुळे राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना करोना काळापासून मुहूर्त सापडलेला नाही. मुंबईसह राज्यातील २५ महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. २०० पेक्षा अधिक नगरपालिका व बहुतांशी जिल्हा परिषदांची मुदत संपल्याने तेथेही प्रशासकीय राजवट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे एप्रिलपूर्वी या निवडणुका होणार की नंतर होणार याबाबतही राजकीय नेते  संभ्रमात आहेत. ग्रामपंचायती या ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. ग्रामीण भागात पकड असल्यास लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अधिक सोपे जाते. यामुळेच राजकीय नेतेमंडळींसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. राजकीय पक्ष आपापली पॅनेल तयार करून िरगणात उतरतात. तरीही सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असा दावा करण्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. यंदाही सोमवारी निकालाच्या दिवशी ते अनुभवास येईल.

वडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती : २३५३

एकूण जागा : २०,५७२

सरपंचपदे : २३५३

पोटनिवडणुका : ३०८०

संरपंच पोटनिवडणूक : १३०

आपलं सरकार

Click to listen highlighted text!