Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RailwayAccidentNewsUpdaate : बिहारच्या बक्सर मध्ये रेल्वे रुळावरून घसरली चार ठार 200 प्रवाशी जखमी

Spread the love

बक्सर : मध्यरात्रीच्या सुमारास बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 200 प्रवाशी जखमी झाले आहेत. दिल्लीहून गुवाहाटीच्या कामाख्याकडे जात असलेल्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला हा अपघात झाला. या एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बक्सरचे डीएम अंशूल अग्रवाल यांनी सांगितले. मध्यरात्री हा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी बचावकार्य सुरू असून ते अजूनही सुरूच आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वेचे कर्माचारी घटनास्थळी दाखल झाले. रघुनाथपूर नजीक ही ट्रेन पोहोचताच सहा डबे रुळावरून उतरल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डीडीयू-पटना रेलखंडच्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातातील अपघातग्रस्त रेल्वेतील प्रवाशांना गावाला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी एक रॅक पाठवण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गावाला जाता येणार आहे.

रेल्वे मंत्र्याचं ट्विट

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , बचावकार्य पूर्ण झालं आहे. सर्व डब्यांची माहिती घेतली आहे. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबाप्रती रेल्वेमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. तसेच, घटनेची सखोल तपासणी करण्यात येईल, असेही म्हटले.

बक्सरमधून 10 रुग्णवाहिका घटनास्थळी

या अपघातात अनेक प्रवाशी डब्यात अडकल्याचं सांगितलं जात होतं. रात्र असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केलं होतं. तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बक्सरहून 10 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ज्या रघुनाथपूर स्टेशनजवळ एक्सप्रेसचे डबे घसरले त्या स्टेशनवर ही एक्सप्रेस थांबत नाही. या एक्सप्रेसचा तो स्टॉपेज नाही. बक्सरहून निघून ही गाडी थेट आरा आणि त्यानंतर पटनाला थांबते. दरम्यान, अपघात का झाला याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

हेल्प नंबर जारी

दरम्यान, रेल्वेने हेल्प नंबर जारी केले आहेत. पटनासाठी- 9771449971, दानापूरसाठी 890569749 आणि आरासाठी- 8306182542 हेल्प नंबर जारी करण्यात आले आहेत. कंट्रोल रूमसाठी 7759070004 हा नंबर जारी करण्यात आला आहे.

वेगाने मदत कार्य : तेजस्वी यादव

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विटरवरुन रेल्वे दुर्घटनेची माहिती देताना मदत व बचावकार्य वेगात सुरू असल्याचे सांगितले. तसेच, SDRF पथक घटनास्थळी पोहोचले असून वेगाने मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी, त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओही रात्रीच शेअर केले आहेत. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागला. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २१ बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!