Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaaharashtraNewsUpdate : धक्कादायक : गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाट सहन न झाल्याने दोघांचा आकस्मिक मृत्यू …

Spread the love

सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाट सहन न झाल्याने तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय ३२ , रा. कवठे एकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय ३५  रा. दुधारी) या तरुणांचा सोमवारी रात्री झाला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. हे दोघेही सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. यामधील शेखर पावशेची १०  दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती असे सांगण्यात येत आहे.

यातील एका प्रकरणाची माहिती अशी की , दुधारी येथील प्रवीण शिरतोडेचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सात वाजता तो कामावरून घरी येत होता. घरी परतत असताना रस्त्यात त्याची दुचाकी बंद पडली. बरंच अंतर दुचाकी ढकलत तो घरी पोहोचला. परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने डबा व गाडी घरी ठेवून तो लगेचच मिरवणुकीत सामील झाला. दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ होऊ लागले. मित्रांसोबत त्याला नाचत असतानाच चक्कर आल्याने तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तर दुसऱ्या घटनेत कवठे एकंदमधील शेखर या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या १० दिवसांपूर्वीच त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. ऐन उत्सवाच्या वातावरणात उमद्या शेखरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री शेखर एका गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता. त्यावेळी विविध मंडळांसमोर जोरजोराने गाणी वाजत होती. डीजेच्या तीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे संपूर्ण गावात दणदणाट सुरु होता. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात भोवळ येऊन पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने तासगावला खासगी रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

शेखर पावशेचा पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीत तरुणाचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!