Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मराठा समाजाला शांततेचे आवाहन , मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश …

Spread the love

मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे झालेला लाठीमार दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. जनतेला शांततेचे आवाहनही शिंदेंनी केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.’

फडणवीस यांनी उत्तर द्यावे- अंबादास दानवे

अंबादास दानवे म्हणाले की, ‘जालन्यतील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचे आंदोलन मोडून काढण्यात पोलिसांनी बळाचा, बेछूट लाठीचा वापर केला आहे. हवेत गोळीबरही केल्याचे वृत्त आहे. याचा मी निषेध करतो. शांततेने आंदोलन सुरू असताना ते दडपण्यासाठी केलेली ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली गेली याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे.’

मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहने पेटवल्याची घटना समोर आली. यानंतर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. लोकांनी शांतता बाळगावी, आंदोलनाला गालबोट लागेल असे वागू नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीसोबत दूरध्वनीवरून बोलताना जरांगे पाटील यांनी हे आवाहन केले आहे.

भाजपने मराठा समाजाची माफी मागावी – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.’

सरकारने मराठा समाजाची माफी मागावी- विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, ‘आजचा लाठीहल्ला हा सरकारचा क्रूरपणा आहे. या घटनेचा निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे.
५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवय आरक्षण देता येणार नाही, हे माहिती असताना सुद्धा खोटे बोलवून मत घेतली.. हक्कासाठी रस्त्यावर उतरणे गुन्हा नाही. मराठा समाजाला फसवणाऱ्यांना मराठा समाज माफ करणार नाही. सरकारने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. ज्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण करून जखमी केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!