Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nashik News Update : मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

Spread the love

नाशिक : मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सटाणा शहरात  आदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात येत असताना या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून दगडफेकीची घटना घडली आहे. या पार्श्वूमीवर  शहरात मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरातून पोलीस मार्च काढला.

गेल्या महिना अडीच तीन महिन्यांपासून मणीपुर राज्यात वातावरण पेटले आहे. त्यावरून देशभरात निषेध आंदोलने केली जात आहेत. राज्यातही अनेक भागात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलने केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात आदिवासी समाजाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून सटाणा तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाने ‘अर्धनग्न’ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला गालबोट लागले असून दगडफेकीची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहर परिसरात वातावरण तापले असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांसह हजारोंचा जनसमूदाय सहभागी होता.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या अर्धनग्न मोर्चाला सुरूवात झाली. आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दरम्यान मोर्चा सुरळीत सुरु असताना अचानक मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलक नेते  निवेदन देवून परत निघाले असताना मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको करत विंचूर – प्रकाशा महामार्ग रोखत वाहनावर दगडफेक केल्याने यात एसटी बसेससह अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या भागातील आमदार आदिवासी असतांना सहभागी न झाल्याने जमाव संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पोलिसांनी तातडीने जमाव नियंत्रित करण्यासाठी फौजफाटा तैनात केला. त्याचबरोबर शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेनंतर सटाणा शहरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी संचलन करत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस अधीक्षक शहाजी उमाप देखील घटनास्थळी दाखल झाले असून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!