Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Sambhaji BhideNews Update : कडेकोट बंदोबस्तात भिडेंच्या सभा, गांधीनंतर भिडे पंडित नेहरूंना भिडले !!

Spread the love

यवतमाळ : काल महात्मा गांधी यांच्यावर मुक्ताफळे उधळल्यानंतर आज यवतमाळ येथे बोलताना संभाजी भिडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य करीत अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले, अशी टीका केली.

भिडे विदर्भ दौऱ्यावर असून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि संरक्षणात त्यांचे कार्यक्रम होत आहेत. कालच्या महात्मा गांधी यांच्या विरोधातील पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यक्रम हणून पाडण्यासाठी अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले परंतु पोलिसांनी त्यांची धरपकड केली.

यवतमाळ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने आज शनिवारी स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

आजच्या व्याख्यानात महात्मा गांधींसंदर्भात भाष्य करणे टाळले. मात्र त्याऐवजी व्याख्यानाच्या ओघात पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले. नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते. देशासाठी नेहरूंचे नखभरही योगदान नसताना ते पंतप्रधान झाले, असे वक्तव्य केले. नेहरूंनी चीनसोबत केलेला ‘पंचशील’ करार हिंदुस्थानाला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला, असा आरोप त्यांनी केला.

हिंदूंना युद्धशास्त्राची गरज

दरम्यान हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, असे बोलून ते म्हणाले की, हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळाच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, यवतमाळ अर्बन बँकचे अध्यक्ष अजय मुंदडा आदींसह संघ परिवारातील असंख्य नागरिक, १८ ते ३० वयोगटातील तरूण, तरूणींची मोठी गर्दी होती.

कार्यक्रमस्थळाला छावणीचे स्वरूप

भिडे यांच्या यवतमाळ येथील व्याख्यानाला अनेक सामाजिक, पुरोगामी, आंबेडकरवारी संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यांचे शहरात लागलेले बॅनर, पोस्टर फाडले. कार्यक्रमस्थळी अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बिपीन चौधरी, सुरज खोब्रागडे, प्रा. घनश्याम दरणे, प्रमोदिनी रामटेके, संगीता पवार आदी असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भिडेंच्या व्याख्यान परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!