Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LoksabhaElection 2024 : कोल्हापूर, हातकणंगलेत सर्वाधिक तर सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये…

Spread the love

मुंबई: राज्यातील सर्वाधिक लक्ष्यवेधी असणाऱ्या 11 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 53.40 टक्के मतदान झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूरमध्ये 63.71 , हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 62.18 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये झाले असून 45.68 टक्के मतदान झाले आहे. 

तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

लातूर – 55.38 टक्के
सांगली – 52.56 टक्के
बारामती – 45.68 टक्के
हातकणंगले – 62.18 टक्के
कोल्हापूर – 63.71 टक्के
माढा – 50.00 टक्के
उस्मानाबाद – 52.78 टक्के
रायगड – 50.31 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्के
सातारा – 54.11 टक्के
सोलापूर – 49.11 टक्के

बारामतीमध्ये सर्वाधिक कमी मतदान

राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.68 टक्के मतदान झाले. इतर मतदारसंघांच्या तुलेनेत हे मतदान कमी असल्याचे दिसून येत आहे.  बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असून शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले आघाडीवर

राज्यातील तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघात निवडणूक होत असून त्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये 63.71 तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये 62.18 टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे.

दरम्यान सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले.  एका तरुणाने मतदान करताना ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. दुपारी तीन वाजताची ही घटना आहे. या घटनेमध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळालं आहे. मात्र ईव्हीएम पेटवण्यामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही. दुसऱ्या टप्प्यातही एका तरुणाने evm फोडून आपला राग व्यक्त केल्याची घटना मराठवाड्यात घडली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

राज्यातील प्रमुख लढती

रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत आहे.

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत होत आहे.

साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे.

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत आहे.

सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत आहे.

माढ्यात भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत आहे.

बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय सामना आहे.

हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील विरूद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे.

 

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!