Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंग यांना बजावले समन्स …

Spread the love

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या आरोप प्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी  भारतीय कुस्ती महासंघाचे  माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना समन्स बजावले. यामध्ये न्यायालयाने ब्रिजभूषण सिंह यांना १८ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान,  पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून मोठा खुलासा झाला आहे.

आरोपपत्रानुसार, फिर्यादीने भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विनयभंग केलेल्या सहा ठिकाणांचा उल्लेख केला आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे सिंग यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग यांसारख्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो आणि शिक्षा होऊ शकते. या आरोपपत्रात एकूण २१ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आल्याची चर्चा आहे. यापैकी सहा जणांनी सीआरपीसी १६४  अंतर्गत त्यांचे म्हणणे नोंदवले आहे.

काय आहे आरोपपत्रात?

पोलिसांनी आरोपपत्रात पॅन ड्राईव्हमधील अनेक घटनांची छायाचित्रे आणि काही व्हिडिओ समाविष्ट केले आहेत. पैलवानांनी दिलेली अनेक छायाचित्रे आहेत. यातील एक फोटो कुस्तीपटू विनेश फोगटचा सिरीफोर्ट स्टेडियममधील ब्रिजभूषण सिंगसोबतचा आहे.

काय म्हणाले ब्रिजभूषण शरण सिंह?

ब्रिजभूषण सिंह यांना टाईम्स नाऊच्या रिपोर्टरने या संपूर्ण प्रकरणातील आरोपपत्राबाबत प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले की, तुम्हाला मसाला द्यायला माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही . यावेळी त्यांना राजीनाम्याबाबत विचारले असता त्यांनी माईक काढून टाकला.

काँग्रेसची प्रतिक्रिया …

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, कायदा आणि नैतिकता सांगते की महिलांवरील अत्याचाराच्या आरोपीला त्यांच्या पदावरून हटवावे, निष्पक्ष तपास व्हावा, अटक करून न्यायालयात शिक्षा व्हावी, पण भाजप सरकारमध्ये असे का होऊ शकते का ? देशाचा आंतरराष्ट्रीय दर्जा उंचावणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार केल्याचे प्रकरण का दडपले जात आहे ? असे विचारून त्यांनी पुढे म्हटले आहे की, “या प्रकरणी संपूर्ण सरकार गप्प का आहे? आरोपी अजूनही भाजपमध्ये का आहेत आणि त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, पाठलाग आणि धमकावणे असे आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर खटला चालवण्यासाठी आणि शिक्षा करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, जानेवारी २०२३  मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, परंतु समितीने या आरोपांकडे दुर्लक्ष केले, ही विडंबना आहे. एवढेच नाही तर क्रीडा मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालातही ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांवर समितीने मौन बाळगले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!