Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार , सोहळ्याला शरद पवार , शिंदे -फडणवीस -अजित पवार यांना निमंत्रण…

Spread the love

पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचे सांगितले. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.

मंगळवार (दि. 1) ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल.

स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन.आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!