महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आम्ही आशावादी आहोत, शिंदे राजीनामा देणार नाहीत, सरकार स्थिर आहे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आणि पुढची निवडणूक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू’, असा दावा त्यांनी केला आहे. सरकार स्थिर आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. सरकार एकदम स्थिर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, विजय आमचाच होईल म्हणणाऱ्यांनी काहीतरी गडबड केलीय, असा संशय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही स्पष्टपणे बोलले.
एकनाथ शिंदे राजीनामा का देतील ?
फडणवीस म्हणाले की , आम्ही निकालाविषयी आशावादी आहोत, कारण आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. पण त्यापूर्वी तर्कवितर्क करणं योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्याच्यावर कुठलाही दावा किवा तर्क मांडणं योग्य नाही. पण आम्हा पूर्णपणे आशा आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा निकालाच्या पार्श्वभूमीवर आहे का ? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ‘अशा चर्चा म्हणजे मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा अधिक काय बोलायचं. कशासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, काय कारण आहे, काय चूक केली आहे त्यांनी?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विदेश दौऱ्यावर
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दोन-तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जात आहेत. यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मी कायम स्वरूपी परदेशात जात नाही. दोन-तीन दिवसांसाठी जातोय. यामुळे जे काही काम आहे ते सुरळीत सुरू राहील. आणि कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
त्या १६ आमदारांची नवे अशी आहेत..
१. एकनाथ शिंदे
२ .अब्दुल सत्तार
३. संदीपान भुमरे
४. संजय शिरसाट
५. तानाजी सावंत
६. यामिनी जाधव
७. चिमणराव पाटील
८.भरत गोगावले
९.लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. अनिल बाबर
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. रमेश बोरणारे
१६. बालाजी कल्याणकर