#OutOfBox | टाकीचे घाव : शाबा यांच्या खडतर जीवनप्रवासाची हृदयद्रावक गाथा
ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीच्या स्थितीत राहून अत्युच्च पदावर पोहचणाऱ्या व्यक्तींची जीवनाची गाथा म्हणजे टाकीचे घाव होय.ग्रामीण भाग,दलित साहित्य,हलाखीची परिस्थितीला सावरून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची कहाणी आत्मकथनातून दिसून येते.अशीच खडतर जीवनाची संघर्षाच्या,दारिद्र्याच्या,ग् रामीण भागातील मुस्लिम अल्पसंख्याक असलेल्या समाजातील लेखक डॉ.शहाबुद्दीन नूरमहंमद पठाण यांची ह्रदयद्रावक व्यथा व संघर्षगाथा आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंप्रि जलसेन येथे सामान्य मुस्लिम घराण्यात जन्म झाला.दवंडी काम करणारे वडील, कष्टमय व खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी आई,लहान भावंडे असा खूप मोठा आप्त परिवार असतांना एक वेळेच्या जेवणासाठी देखील झिजावे लागत होते.अश्या खडतर परिस्थितीत शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती,झालेला अगणित शारीरिक,मानसिक त्रास त्यातून राज्याच्या उच्च शिक्षण संचालक ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असा प्रवास होतांना विविधांगी ‘टाकीचे घाव’ ३५ प्रकरणातून आयुष्याची सत्यकथा मांडलेली असल्याचे स्पष्ट जाणवते.लेखक गरिबीच्या विळख्यातून कसे शिकले?? यांचे वर्णन ‘टाकीचे घाव’ या आत्मकथनातून मांडले आहे.अनवाणी पायाने दररोज ये-जा १६ किलोमीटर पायी जाऊन प्राथमिक,माध्यमिक शिक्षण घेतले.पुढे ‘कमवा व शिका’ या योजनेतून स्वावलंबी शिक्षणातून घेतलेली उत्तुंग झेप ‘वेदना व प्रेरणा’ मांडलेली आहे.आजच्या तरुण पिढीला हे आत्मकथन ‘स्फूर्तीचा जिवंत झरा’च आहे त्यामुळे डॉ.श. नू. पठाण यांचा आत्मकथन घराघरात वाचले पाहिजे.
ग्रामीण भागातील सामान्य मुस्लिम समाजात जन्माला आलेल्या डॉ. शहाबुद्दीन यांचे जीवनच खरोखर संघर्षमय राहिले आहे.डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक मळ्यात राहून शिक्षणाची गंगा फुलविणारे शाबा यांचे मन,मेंदू व मनगट घट्ट झालेले आहेत.घरची आर्थिक परिस्थिती,विद्यार्थीदशेपासून जीवन जगण्याच्या झळा सोसाव्या लागल्या.’टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही’ त्याप्रमाणे ‘संघर्षातून तावून-सुलाखून निघाल्याशिवाय मूर्ती घडत नाही’.ग्रामीण भागात प्राथमिक,माध्यमिक शाळेसाठी पायपीट,माध्यमिक शिक्षणासाठी झालेली त्रेधातिरपीट त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्याला घेतांना फीजसाठी झालेली व्यथा,शिक्षकाची नोकरी,प्राध्यापक,कमवा व शिका योजनेचे प्रमुख,प्राचार्य,वनस्पतिशास्त् र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष,राज्याचा उच्च शिक्षण संचालक ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असा झालेला खडतर जीवनाच्या प्रवासाचा आलेख ‘टाकीचे घाव’ मध्ये दिलेले आहे.गरिबीच खरी माणसाला जीवनाचे शिक्षण देत असते.५० रुपयांसाठी चुलत्याकडून उसणे मागण्यासाठी आई गेली असता दिवसभर थांबून देखील पैसे मिळत नाही अशी दयनीय अवस्था निर्माण होते तेव्हा वाचकांच्या हृदयाचा,मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.’टाकीचे घाव’ या आत्मचरित्राला विख्यात समीक्षक,संशोधक डॉ.रं. बा.मंचरकर,अहमदनगर यांची सुंदर अशी प्रस्तावना लाभलेली आहे तर डॉ.गुंफा कोकाटे व प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांनी पुरस्कार यामधून शुभेच्छा दिलेल्या आहेत.मुखपृष्ठातून टाकीचे घाव सोसणाऱ्या डॉ.श.नू.पठाण यांनी स्मित हास्य फुलवून तरुणाईला संदेश देत असल्याचे हुबेहूब चित्र अजय मोदीने काढले आहे.प्रफुल्लता प्रकाशन,पुणे येथून या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे.
लेखक डॉ.शहाबुद्दीन नूरमहमद पठाण यांनी ‘टाकीचे घाव’ या आत्मचरित्रात एकूण ३५ लेखमालेतून जीवन संघर्षाची व्यथा व गाथा सत्य परिस्थितीकथन केली आहे.जीवनात पुष्कळ टाकीचे घाव सोसले.मान-अपमान सहन केले तरी देखील प्रचंड आशावाद मनी बाळगून खंबीरतेने लढा देऊन यशस्वी झाले.खरे तर आजकाल ग्रामीण भागातील,दलित असल्यामुळे वा मुस्लिम समाजात जन्माला आल्यामुळे वाव नाही असं पोकळपद्धतीने बोलल्या जाते पण आलेल्या संकटावर मात करतांना संधी म्हणून बघितल्या जावी आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा मौलिक सल्ला लेखक डॉ.श.नू. पठाण देतात.लेखकाचे मूळ गाव कुसुर (जिल्हा पुणे) असले तरी पिंप्री जलसेन येथेच आजोळी (आईच्या वडिलांकडे) त्यांचा जन्म झाला.आईला सात भाऊ असल्याने लेखकाला सात मामा आणि लेखकाला दोन भाऊ व दोन बहिणी असा मोठा गरीब परिवार होता.हजार-बाराशे वस्ती असलेला व पिढ्यानपिढ्या दगडी व्यवसाय करणे हा वडिलांचा धंदा होता त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून कुटुंबाचा कसा-बसा गाडा हाकायचा..गाव हा जातिभेदवीरहित होते.गावातील दृश्य बघता हिंदू-मुस्लिम ऐक्याचं व उत्तम जातीय सलोख्याचे प्रतीकच होते.एकदा गावात अफवा पसरली की,लेखकाच्या वडिलांनी कोकणात जाऊन दुसरे लग्न केले आहे त्यामुळे आईने साहसाने,धाडसाने कोकण गाठले नि वडिलांचा शोध घेतला.अफवा खोटी असल्याची बातमी समजताच लेखकासह आई गावाची वाट धरली.साहस हीच खरी शक्ती असा आईचा करारीपणा दिसून येतो.कोकणातून ट्रेननी परतत असतांना लेखकांच्या हाती नवाबभाईने (मामा) दिलेली अंकलिपी म्हणजे शाळेचा श्रीगणेशा होय.ट्रेनच्या शेजारी बसून खिडकीतून हिरवीगार शेताचा आस्वाद घेतांना ताडकन खिडकीचं शटर बोटाच्या नखांवर पडल्याने नखंच उघडून पडलं (पृ. क्र ४०) लेखकाचे रक्तबंबाळ झालेलं बोट बघून वडिलांनी प्रेमाने घेऊन दिलेलं लुगडं क्षणाचाही विलंब न लावता फाडून बोटावर बांधले आणि मायेच्या पदराखाली केव्हा झोप लागली लेखकाला कळले नाही यातून आईचे प्रेम किती अलौकिक,दिव्य,मातृभक्ती यातून दिसून येते.
पिंप्री जलसेन येथील जिल्हा परिषदेच्या ‘जीवन शिक्षण विद्यामंदिरात’ प्राथमिक शिक्षण सुरू झाले. (पृ.क्र.४३) पण गरिबीमुळे एक दिवस गाईला चरायला डोंगरावर जायला लागल्याने दिवसभर लेखक रडत होते.शाळा बुडाल्याने अतीव दुःख झाल्याची बाब आईला समजताच तेव्हापासून आईने कधीही गाई चारायला पाठविले नाही.प्राथमिक शिक्षण व शिक्षक त्यात कोठावळे गुरुजी नेहमी शहाबुद्दीन हिरा असल्याचे उल्लेख करीत असे आणि सभाधारिष्ट्य,भाषणकला विविध कला जोपासण्याचे मंदिर म्हणजे प्राथमिक शाळा होती.शिक्षकांनी केलेल्या संस्कार व शाळेत जाण्याची,शिकण्याची ओढ अधिकच वाढत गेली.हायस्कुल मध्ये असतांना १६ किलोमीटर पायी अनवाणी पायाने जावे लागे. घरामध्ये अठरा विश्व दारिद्र असल्याने पीठ नसणे ही नित्याचीच बाब अश्यावेळी काशीगिरबाबाकडून चार आण्यात शेरभर पीठ घेऊन भाकरी करीत असल्याने उपाश्यापोटी लेखकाला जावे लागे तेव्हा आई काठ्या कुट्यांचा रस्ता तुडवीत तेवढे अंतर पार करून नेऊन द्यायच्या. (पृ.क्र ४९) पूर्वी सातवीच्या परीक्षा तालुक्याच्या केंद्राच्या ठिकाणी होत होत्या त्यात पहिल्या क्रमांकाने पास झालेला शाबा हायस्कुलच्या शाळेत जाण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने जाऊ शकत नव्हता त्याकाळी ६ किलोमीटर अंतर पार करून वडझिरे येथे जावे लागत होते.गणवेश नव्हता तेथील मुख्याध्यापकाने देऊ केल्याने शक्य झाले.जनसेवा विद्यालय वडझिरे येथे माध्यमिक शिक्षण सुरू झाले.पुष्कळदा उपाशीपोटी शाळेत जावे लागायचे तेव्हा आई घरासाठी,लेखकांसाठी झिजून भाकरी आणून देत होत्या हे आठवड्यातून तीन-चारदा घडायचेच कारण काम केल्याशिवाय घरातील चूल पेटायची नाही अशी दयनीय अवस्था या कुटुंबाची होती. (पृ.क्र५४)
हायस्कुल मध्ये असतांना एका शिक्षकाने एका मुलींचा विनयभंग केल्याने त्यातून त्यांना काढून टाकण्यात आले.चारित्र्य म्हणजे काय? हे समजत नसतांना देखील मुख्याध्यापक शेवाळे सर यांनी ‘चारित्र्य संपले म्हणजे सर्व संपले!’ म्हणून जीवनात चारित्र्य हाच खरा दागिना असल्याची जाणीव करून दिली. प्रत्येक वेळेला याची जाणीव ठेवल्याची आठवण लेखक करून देतात.(पृ क्र६१)ग्रामीण मुस्लिम समाजातील तल्लख बुद्धीचा शाबा यांना वडझिरे या गावातील लोकांचे प्रोत्साहन सतत मिळाले.पहिला नंबर आल्याने दिलेले बक्षीस व पाटलांनी दिलेले १५ किलो तांदूळ हे लेखकांसाठी अतिशय प्रेरणा देणाऱ्या बाबी आहेत.बुद्धिमत्तेला भावनेची जोड असल्याची साक्ष गावकऱ्यांनी दिले.(पृ क्र ६५)शालेय जीवन खऱ्या अर्थाने आंबे,चिंचा, बोरं, करवंद,शिंदी,जांभळी असे समृद्ध असलेला रानमेवा चोरून खाण्याची म्हणजे बालपण चाखल्याची सुंदरशी आठवण शालेय जीवन-आंबट गोड या लेखात आहे.हायस्कुल मध्ये असतांना गुरुवार हा बाजारांचा दिवस त्यामुळे सकाळ पाळीत शाळा आटोपल्यावर घरातील लोकांनी सांगितलेल्या सामानाची साहित्याची यादी घेत असे.धान्य घेऊन गिरणीवर असलेल्या महिलेकडून सूप घेऊन न लाजता निवडून दळणासाठी धान्य दिल्या जायचे आणि डोक्यावर घेऊन दळण घरी लवकर येत असे त्यामुळे भाकरी लवकर खायला मिळत होती. (पृ क्र.७२) दरवर्षी दरोडी येथे शेख बाबांच्या दर्ग्यावर उरूस भरत असे.हिंदू-मुस्लिम सर्व जातीतील लोक ट्रक,टेम्पो,कारने यायचे.पाच फकीरांना जेऊ घातल्याशिवाय इतरांना जेवणाची संधी नव्हतीच असा दोन दिवसांचा उरूस मोठ्या प्रमाणात भरत होता. (पृ.क्र७६) आता दहावीचे वर्ष जवळ येऊन ठेपलेले होते.दररोज ये-जा करण्याने वेळ जात होता.खोली करून राहणे परवडणारे नव्हते तेव्हा मोहन राऊत (राऊतवाडीतील सवंगडी) यांनी आपल्या खोलीवर राहून त्यांच्यासमवेत जेवण,अभ्यास करण्याने पुष्कळ समस्या सुटल्या होत्या.यातून दाट मैत्री,जातिभेदाचा द्वेष नसलेली निखळ मैत्री दिसत होती. (पृ क्र८०) दहावीला असतांना ६६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात पहिला असल्याने आता शिक्षण सोडून वडिलांना मदत करावी असा लेखकाच्या मनात विचार येई. नेहमी मदत करणारे वा शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करणारे शेवाळे सर यांची बदली झाली होती.आई-वडिलांकडून पैसे मागू शकत नव्हते.काम शोधून त्यातून मिळणारे इसार द्यावा पण काम मिळत नव्हते.तलाठी यांनी केलेली शिफारस व २० रुपये ही आर्ट कॉलेजमधील तगमग होती पण लेखकाला सायन्स कॉलेजला प्रवेश घ्यायचे असल्याने ती योजना बाळगळली.बाबा मोरे यांना भेटून व तडजोड करून अखेर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सातारा गाठले.’कमवा व शिका’ या योजनेतून दररोज तीन तास काम करून शिक्षण घेतले त्यात त्यांच्या गावाकडील सिनिअर गहिना मोरे तिथेच सापडल्याने त्याची मदत लेखकाला वेळोवेळी झाली आहे.वॉचमनच काम करीत असतांना अचानक साताऱ्याला भूकंपाचा थरार अनुभवायला मिळाल्याने भीती निर्माण झाली.बारावीचे वर्ष असतांना फीचे पैसे नसल्याने ८ ते १० दिवस अभ्यासाविना फिरावे लागले त्यामुळे दारिद्र्याची अत्यंत दाहकता त्या काळात लेखकाला जाणवली. (पृ.क्र९३)
साताऱ्याला भूकंप झाल्याने भीतीदायक चित्र निर्माण झाले म्हणून लेखक गावी आलेत.गावातील आईची मैत्रीण (नानूमावशी) यातील संवाद लेखकांनी ऐकला आणि साताऱ्याला कोणत्याही स्थितीत जाण्याचा निर्णय घेतला कारण मुलगा म्हणजे बँकेतील ठेव अशी आईची धारणा होती त्याला सार्थ ठरविणे हे कर्तव्य लेखकाचे होते.”रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषाकाल” याप्रमाणे महाविद्यालयातील खडतर दिवस,कष्टमय परिस्थिती, हे सारे डॉ.बी.एस. पाटील प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.(पृ.क्र१०७)बी.एस.सी द्वितीय वर्षाला असतांना शैक्षणिक सहल वनस्पतिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ.पी.बी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाबळेश्वरला गेली.वेगवेगळ्या वनस्पतींचे नमुने गोळा केल्यानंतर एक तास तुमच्या इच्छेने वेळ घालविण्यास दिले तेव्हा अलग अलग गटात मित्रांचे घोळके जायला निघाले. त्यात शाबाचा गट पुन्हा याठिकाणी येणे नाही म्हणून जुने महाबळेश्वर बघण्यास गेले पण परत येतांना उशीर झाल्याने प्राध्यापक रागावणार अशी भीती याउलट मधाची बाटली व शाबासकी मिळाली यात त्यांचे नेतृत्वगुण दिसून आले. (पृ.क्र११४) महाविद्यालयात स्नेहसंमेलन म्हणजे तरुणाईचा हर्षोल्हास असतो.प्रत्येक वेळेला पैसे,वस्तूची मदत गहिना मोरे करीत होते.भेटण्यास आलेले लेखकाचे चुलत काका,त्यांनी दिलेला मूलमंत्र,लेखकांची स्नेहसंमेलनच्या ठिकाणची अनाउन्समेंट ही आत्मसन्मान वाढविणारी होती.गहिनाकडून उसना घेतलेला मनिला,एकाकडून टॉय तर अश्याच पद्धतीने गरिबीचे प्रदर्शन न करता आनंदाने सहभागी होण्याचा क्षण कधी लेखकांनी सोडला नाही(पृ.क्र११९)पूर्वी निवडणुका कॉलेजमध्ये होत होत्या.ग्रामीण व शहरी विद्यार्थी असे दोन गट पडले होते.प्रचार-प्रसार मोठ्या धुमधडाक्यात वाटेल त्या मार्गाने करीत होते.जनरल सेक्रेटरी हे प्रमुख पद लेखकाचे मित्र केशव खानदेशी यांना मिळाले.(पृ क्र१२५)हायस्कुल मध्ये शिक्षण घेतांना इंग्रजीचे अध्यापन करणारे शिक्षक डी. ए. ठुबे यांच्या शिफारशीने व बाबुराव घोलप अध्यक्ष यांच्या आदेशाने शिक्षकाची नोकरी लागली.जून १९७० मध्ये ३५० रु प्रतिमाह आणि १५० रु रोख ऍडव्हान्स मिळाला त्या पैशातून बाजारहाट करून गावी गेले.गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कष्टातून बी.एस.सी. करून नोकरीला लागल्याने गावात गूळ वाटून आनंद व्यक्त करण्यात आला होता.(पृ.क्र१३०)डॉ.पी.बी.चव्हा ण सर यांनी पोस्टकार्ड द्वारे तुझ्यासारख्या मुलाने शिक्षकांची नोकरी करणे उचित नाही त्यापेक्षा पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.द्विधा मनःस्थितीत लेखक अडकले.शाळेतील मुख्याध्यापकाला न सांगता कोल्हापूरला उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला.शिरोली बुद्रुक वरून पुणे आणि नंतर सातारा ते कोल्हापूर हे ट्रकने अंतर पार करून शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर गाठले.तिथे सातारचे प्राचार्य डॉ.बी.एस.पाटील यांच्यामुळे कुलसचिव डॉ.उषा इथापे यांच्यामुळे ‘कमवा व शिका’ योजनेत एम.एस. सी.(बॉटणी)ला प्रवेश मिळाला.(पृ.क्र.१३५)मनात शिकण्याची प्रबळ इच्छा,काम करण्याची लाज न बाळगता स्वावलंबीचे धडे व शिक्षण मिळत होते.कमवा व शिकाचे सुपरवायझर पोतदार यांच्या निगराणीत शेती,चिखल कोळपणी,हायवे कॅन्टीन,लेडीज हॉस्टेल मध्ये गवत काढणे,खड्डे करणे,रोप लावणे,पाणी घालणे,वीटभट्टी इत्यादी कामे लेखक आनंदाने करीत होते.राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांना स्वतःच शिक्षण स्वतः कसं करतो याचं कथन सर्वांसमोर लेखकांनी इंग्रजीत केल्याने लेखकाचे कौतुक केले.(पृ क्र१४७)
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथे वनस्पतिशास्त्राचे अध्यापन करतांना विभाग प्रमुख प्रा.डॉ.जी.व्ही.जोशी,डॉ.ए. आर.कुलकर्णी यांच्या सहवासात असणे म्हणजे वनस्पतिशास्त्राचे वा ज्ञानाचे भांडारच होय.स्वतःच्या घरी सौ.नसतांना स्वयंपाक घरापर्यंत येऊन चहा पिल्यामुळे जातीचे कांगोरे पडून मानवतेचे दर्शन त्या दिवशी दिसून आले.(पृ.क्र१५२)निकाल लागण्यापूर्वी सेकंड क्लास मध्ये येण्याच्या अटीवर डॉ.हापसे यांच्या शिफारशीने पदमश्री विखे पाटील महाविद्यालय,प्रवरानगर येथे अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नवीन कॉलेज असल्याने ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करायची असल्याने त्यांचा चार्ज देखील लेखकाकडे देण्यात आला होता.पहिला लेक्चर विद्यार्थ्यांना एवढा आवडला की,सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांत रमणारे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून गणले जाऊ लागले.(पृ.क्र१६२)प्रवरानगर हा देशातील पहिला साखर कारखाना जवळ टिनाच्या पत्रात वर्ग भरत होते.विद्यार्थिसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने भव्य इमारत,वृक्षारोपण करून नंदनवन फुलविण्यासाठी कमवा व शिका योजनेचे प्रमुख पद लेखकाकडे सोपविण्यात आले.(पृ.क्र १६७)नवीन नवीन संकल्पना,कॅन्टीनचे नियोजन,माळरान ते फुलबाग फुलविणे,त्यात नेतृत्व,कर्तृत्व याचा सुरेख संगम करून घामाने नंदनवन फुलविले.(पृ.क्र १७३)
अगदी कमी वयात उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापकाची नोकरी मिळाली होती.प्रवरानगर ते अहमदनगर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी विवाह करण्यासाठी आमंत्रण दिल्या गेले पण घरातील असलेली वास्तव परिस्थिती,अशिक्षित आई-वडील, त्यांना सांभाळणारी सुविद्य पत्नीचा शोध सुरू झाला आणि सांगलीतील प्रा.के.जी.पठाण यांची बहीण अगोदर बघितली त्यानंतर आई-वडील,मामा यांना जाण्यास सांगितले पण लेखकाची पसंद म्हणजे सर्वांची पसंद असे समजून २५ आगस्ट १९७४ ला मोजक्या मित्रांच्या साक्षीने,इतरांच्या सहकार्याने कमी खर्चात विवाह उरकण्यात आला.(पृ.क्र१८२)विवाह पार पडल्यानंतर मोहरमचा महिना असल्याने माहेरीच सौ.ला राहावे लागले.एक महिना लोणी या ठिकाणी प्राध्यापक कॉलनीत घर मिळाले.घरासाठी लागणारे सामान आणण्यात आले.पोपटशेठने किराणा उधारीवर दिले.कधी नव्हे एवढा किराणा पहिल्यांदाच शाबाच्या घरी आल्याने सौ.देखील आनंदून गेल्या होत्या पण आनंद फार काळ टिकला नाही कारण आठवड्याभरात किराण्याचे उधारी पैसे द्यायचे होते.तत्कालीन काळात प्राध्यापकाला ५४६ रुपये पगार त्यात घरी पाठवावे लागायचे,बहिणींचे लग्न उरकल्यामुळे कर्जाचा डोंगर आणि पोपट शेठचे ७०० रुपये कसे द्यायचे हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर होता.प्राध्यापकाची नोकरी लागून देखील टाकीचे घाव पाठ सोडत नव्हते.त्याच रात्री सौ.ला पत्र लिहून आर्थिक संकटाची बाजू सांगितली,आठ दिवसातच नव्याने नांदायला आलेल्या नववधुची चेन सोनाराकडे विकून टाकली.लेखकाच्या सुविद्य पत्नीने दाखविलेली उदारवृत्ती,त्यागमय मूर्तीच्या मनाची होत असलेली घालमेल सोडविली.(पृ.क्र१८८)
विद्यापीठाच्या सर्व योजना लोणीमधील कॉलेज राबवायचे त्यामुळे अल्पावधीतच पुणे विद्यापीठातील ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्याचे महाविद्यालय म्हणजे प्रयोगशाळाच होती अशी ख्याती पसरली.एकदा प्रा.डॉ.राम ताकवले यांचे कॉलेजमध्ये भाषण होते.त्यांचे विशाल ज्ञान,व्यासंग,संशोधनाची दृष्टी याबाबत भाषण अतिशय प्रेरणादायीच होते.’संशोधनाशिवाय अध्यापन अपूर्ण आहे’ म्हणून लेखक डॉ.शहाबुद्दीनला कलाटणी देणारे व संशोधनाच्या वाटेवर जाण्यासाठी ‘वळण’ देणारे ठरले.पुणे विद्यापीठात डॉक्टरेट करण्यासाठी अर्ज केला पण शिवाजी विद्यापीठात फेलोशिप मिळवून संशोधन करू लागले त्यात ए. आर.कुलकर्णी सरांची वेळोवेळी मदत,सहकार्य लाभले.१९८२ साली पी.एच.डी. झाली त्याच काळात सौ.देखील सातारा येथे बी.एड करीत होते व १९८४-८७ या तीन वर्षांच्या कालखंडात पुणे विद्यापीठात वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचा अध्यक्ष देखील लेखक झाले.(पृ.क्र१९६)
अत्यंत खडतर जीवन विद्यार्थीदशेपासून एक एक टाकीचे घाव सोसत होते.डॉक्टरेट झाल्यानंतर विविध कॉलेजचे प्राचार्य पद उपभोगले. पुढे राज्याचा उच्च शिक्षण संचालक म्हणून कार्यभार बघितला.८३ वर्षाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर येथे कुलगुरू म्हणून महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील पहिला कुलगुरू होण्याचा मान मिळविला.सौ.जितूला देखील शिक्षकाची नोकरी असल्याने चांगला पगार आहे.त्यागात व कष्टातच सुख मिळते हा मंत्र सदोदित सुविद्य पत्नीला लेखक देत असायचे.अनवाणी पायाने माळरान हुंदळणारा शाबा,आईची प्रेरणा, मातृभक्ती ते डॉ.शहाबुद्दीन पठाण यांचा कुलगुरू पर्यंतचा संघर्षाने पेरलेला जीवनप्रवास इतरांना प्रेरित केल्याशिवाय राहणार नाही.मागील तीन दशके टाकीचे घाव सहन करून मूर्ती तयार झालेली आहे.मुस्लिम समाजातील गरीब घराण्यात प्रतिकूल परिस्थितीत झुंज देऊन यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचणाऱ्या लेखक डॉ.शहाबुद्दीन पठाण यांचे आत्मकथन इतरांनी नक्कीच वाचावे.डॉ.शहाबुद्दीन यांचे आत्मचरित्र ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देणारा आहे त्यामुळे प्रत्येकांनी या आत्मचरित्राचा आस्वाद घेऊन शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा अशाच प्रकारची साहित्यकृती लेखकाच्या हातून घडावी तसेच त्यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!!
—————————— —————-
पुस्तकाचे नाव : टाकीचे घाव
लेखकाचे नाव : डॉ.श.नू.पठाण
प्रकाशन : प्रफुल्लता प्रकाशन,पुणे
मुखपृष्ठ : अजय मोदी,पुणे
मुद्रक :मंडलेचा इंटरप्रायजेस, पुणे
मूल्य :२५०/- रुपये
—————————— —————-
by, दुशांत बाबुराव निमकर मो.नं : ९७६५५४८९४९
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
News Update on one click
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055