MaharshtraNewsUpdate : महिला पत्रकाराला टिकलीवरून “भिड”णाऱ्या “आंबा फेम “”भिडें”ना भिडल्या रुपाली चाकणकर आणि नीलम गोऱ्हे …

मुंबई : ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असे बोलून महिला पत्रकाराचा अपमान केल्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी “आंबा फेम “संभाजी भिडे यांना चांगलाच दम देत त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले आहे.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुले होतात’, असे वक्तव्य केले होते. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचे आहे. ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा,” असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांची संतप्त प्रतिक्रिया…
दरम्यान भिडे गुरूजींच्या वादग्रस्त विधानावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे की , ‘भारतमाता हे सर्वांचे श्रद्धा स्थान आहे. त्यात आपल्याला तिचे व्यक्ती म्हणून कोणाचेही रूप निश्चित करता येणे अशक्य आहे. असे असतानाही भारतमातेच्या प्रतिकाच्या निमित्ताने संबोधून स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यात नाहक ढवळाढवळ भिडे गुरुजी करीत आहेत. हा भिडे गुरुजी यांचा प्रयत्न झोटिंग शाही आहे की काय असे वाटत आहे’.
‘मंत्रालयात असे प्रकार घडणे अतिशय गंभीर आहे. याबद्दल काळजी वाटावी असे आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी भिडे गुरुजींच्या या दुजाभाव देण्याच्या वागणुकीबद्दल तीव्र शब्दांत खेद व्यक्त केला आहे आणि नापसंती दर्शवली आहे.
राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आलो होतो …
दरम्यान संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. या भेटीबाबात बोलताना ते म्हणाले, “मी राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे”, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. “ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचे होते. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे आज वेळ काढून मी त्यांना भेटायला आलो”, असे ते म्हणाले. तसेच सरकारच्या कामागिरीबाबत विचारले असता त्यांनी हे सरकार सरकार उत्तमरित्या काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.