Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ‘आनंदाच्या शिधा’वर ऑनलाईनचे विरजन…आल्या नव्या सूचना …

Spread the love

शिधापत्रिकाधारकांच्या संतापानंतर सरकारचा ऑफलाईनचा उतारा…

मुंबई | राजू झनके :  सर्वसामान्य माणसांचे आणि शेतक-यांचे सरकार म्हणून गाजावाजा होत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारने मोठ्या थाटामाटात जाहीर केलेल्या  आनंदाचा शिधा योजनेवर ऑनलाईनचे विरजन पडल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये उफाळलेला संताप लक्षात घेता राज्य सरकारने ऑनलाईनची ही योजना ऑफलाईन करण्याची वेळ  आली.आज रविवार  दिनांक  २३ ऑक्टोबर पासून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना आता बोटांचे ठसे न उमटवता १०० रुपयांचा आनंदाचा शिधा घेता येणार आहे. दरम्यान रेशनवर मिळणा-या शिधासंचामध्ये पामतेल निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या प्रा  सुषमा अंधारे यांनी केला आहे.


महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.

लांबच लांब रांगा …

दिवाळीचा शिधा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून सुरु होती. कालपासूनच इंटरनेटच्या माध्यमातून सुरु असलेली ही व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात  अत्यंत  संथगतीने सुरु असल्यामुळे आनंदाचा शिधावर ऑनलाईनचे विरजन पडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ऐन दिवाळीच्या तोंडावर संतापाची लाट पसरली होती. राज्यात हा शिधा घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या परंतु इंटरनेट सेवा डाऊन झाल्यामुळे ठिकठिकाणी रेशनिंग दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक नागरीकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार पहावयास मिळाले. दुकानदारांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली .संपूर्ण महाराष्ट्रातूनच या तक्रारी आल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळीच   अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिधावाटप नियंत्रक मुंबई आणि सगळ्या जिल्हा नियंत्रक  यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली.

दिवाळीच्या निमित्ताने शिधा जिन्नस उपलब्ध करणे ही प्राधान्याची बाब असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचविण्याच्या सचूना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

विभागाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळीत सुरु आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ लागत आहे असे निदर्शनास येते तेथे आजपासून आनंदाची शिधा ही दिवाळी भेट ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे.

रास्त भाव दुकानदारांना सूचना…

ऑफलाईन पध्दतीने केलेल्या शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. तसेच नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (१०० रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाच्या आहेत.  काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर जे उपलब्ध जिन्नस आहेत ते देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या परिस्थितीत उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येणार आहे. मात्र पुरवठादाराकडून सगळेच जिन्नस त्वरेने प्राप्त करवून घ्यावे अशा सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या आहेत.

या आहेत महत्वाच्या अटी …

ऑफलाईन पद्धतीचा वापर होत असल्याने लाभधारकास त्याचे जोडुन दिलेल्या दुकानातूनच शिधा जिन्नस वितरित करणे गरजेचे आहे.  जिन्नस वाटप हा दुकानदाराकडून त्याच्या नेहमीच्या ओळख असणाऱ्या शिधाधारकाला होणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी रु. १०० ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी कि संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानस्तरावर निर्णय घेण्यात येईल. या वितरणाचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसेच उर्वरित जिन्नस प्राप्त झाल्यावर त्याची लाभधारकाकडून पोच घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल या अटीवर उपलब्ध जिन्नस वितरीत करता येतील.

ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधाजिन्नस वाटपासाठी लागू आहे.  एन एफ एस ए आणि पीएमजीकेएवाय योजनेसाठी ऑनलाईन पद्धतच वापरण्यात यावी.तसेच दिवाळी भेट वाटपासाठी ऑफलाईन  पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामात येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याच्या व कारवाई करण्याचे निर्देश  रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!