Book Review Update : ग्रंथ परीक्षण : वाचावे असे काही …. दानशूर महाराजा सयाजीराव…

महाराजा सयाजीराव गायकवाड प्रगल्भ विचारांचे नृपती होते. त्यांनी ज्ञानात्मक प्रबोधनातून समाजसुधारणा केल्या. राजगादीवर आल्यावर अल्पावधीतच त्यांच्या लक्षात आले की, प्रजेची उन्नती करायची असेल तर ज्ञानाबरोबरच धनाचीही आवश्यकता आहे. महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यावर काही लक्ष तोट्यात असणारे बडोदा राज्य सुप्रशासनाने, काटकसरीने आणि राज्याची उत्पादकता वाढवत जगात सातव्या क्रमांकाचे श्रीमंत बनवले. या निर्माण केलेल्या धनसंपत्तीचा उपयोग इतर राजांसारखा हौसमौज करण्यासाठी केला नाही, तर याचा उपयोग प्रजेच्या आणि पर्यायाने जगाच्या उत्थानासाठी केला.
सयाजीराव महाराजांनी बडोद्याबरोबर, हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगभरातील जे – जे समाजद्रष्टे गरीब – अनाथांसाठी झटत होते त्यांना उदारहस्ते साहाय्य केले. यामध्ये समकालीन पितामह दादाभाई नौरोजी, जमशेटजी टाटा, न्या. रानडे, ना. गोखले, म. फुले, लो. टिळक, म. गांधी, म. शिंदे, म. कर्वे, क. भाऊराव पाटील, गंगारामभाऊ म्हस्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबूराव जगताप, अरविंद घोष या आणि अशा अनेक समाजधुरिणांचा समावेश होता. सामाजिक परिवर्तन करू पाहणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील संस्थांना त्यांनी उदारहस्ते मदत केली. त्यामुळे आधुनिक भारतातील अनेक व्यक्ती आणि संस्था उभारल्या. महाराजांचे हे प्रचंड दातृत्व अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. त्यांनी ८९ कोटींचे सत्पात्री दान दिले. आजघडीला याची किंमत दीड लक्ष कोटीहून अधिक आहे. जगाच्या कल्याणासाठी एवढे दान देणारा हा जगातील कदाचित एकमेव राजा असेल. त्यांच्या प्रचंड दातृत्वाचा आढावा या ग्रंथातून घेतला आहे.
दानशूर महाराजा सयाजीराव ग्रंथाचे मुद्रण अलीकडेच शासकीय मुद्रणालय, पुणे येथे पूर्ण झाले आहे. ग्रंथ निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष मा. बाबा भांड, अध्यक्ष सदानंद मोरे आणि सचिव मा. मीनाक्षी पाटील यांचे सहकार्य लाभले. सदरहू ग्रंथाचे नेटके संपादन मा. यमाजी मालकर यांनी केले. तर मुखपृष्ठ मित्रवर्य महेश मोधे यांनी कलात्मक तयार केले. ग्रंथाची अंतर्गत सजावट राजेश दुबे यांनी केली.
ग्रंथाचे नाव : दानशूर महाराजा सयाजीराव
संपादक : यमाजी मालकर
लेखक : डॉ. राजेंद्र मगर
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
पृष्ठे : ४२४
किंमत : २०४ रुपये.