Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBANewsUpdate : निवडणूक विश्लेषण : वंचित बहुजन आघाडीने काय कमावले आणि काय गमावले ?

Spread the love

2024 मधील लोकसभेत वंचितची स्थिती.
एकूण लढवलेल्या जागा : 38
मिळालेली मते : 15 लाख 66 हजार 949
इतरांना पाठिंबा दिलेल्या जागा : 07
उमेदवार नसलेल्या जागा : 03


2024 च्या  लोकसभा निवडणुकीत एक मोठी शक्ति म्हणून ओळख असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते . प्रारंभीच्या काळात वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी सोबत राहील असे वाटत असतानाच वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला इंडिया आघडीच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळत नाही तसेच सन्मानाची वागणूक मिळत नाही असा आरोप करीत वंचितने एकला चलो ची भूमिका घेतली होती परंतु ही भूमिका वंचितला पराभवाच्या  दिशेने घेऊन तर गेलीच आहे परंतु  2019 च्या तुलनेने  राज्यात यावेळी  ‘वंचित फॅक्टर’ पूर्णतः निष्प्रभ ठरला आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा गड असलेल्या  अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा दारूण पराभव झाला. येथे 2,76,747 मतांसह प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर वंचितने अधिकृत लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला फक्त 15 लाख 66 हजार 949 मतदान मिळाले आहे. शिवाय अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वचिंतच्या उमेदवाराची अनामत  जप्त झाली आहे.


ठाकरे गटाला  तीन  जागांवर झाली असती वंचितची मदत…

 2019 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितमूळे जवळपास 15 मतदारसंघात फटका बसला होता. परंतु यावेळी अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला लाखाच्या खाली मतदान मिळाले. यावरून हेच स्पष्ट होत आहे की , प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या आंबेडकरी , ओबीसी आणि अल्पसंख्यांक समुदायाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेली वेळेप्रमाणे  वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीवर विशेष परिणाम झाला नाही . मात्र मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना वंचितचा फटका बसला . कारण येथे किर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला जिथे वंचितच्या परमेश्वर रणशुर यांना 10052 मते मिळाली.

आघाडीत न जाण्याचा फटका…

अकोल्यात स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत न जाण्याचा फटका सहन करावा लागला येथे भाजपचे अनुप धोत्रे यांचा 40626 मतांनी विजय मिळवला. जिथे कॉँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर प्रकाश आंबेडकर 2,76,748 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना पाठिंबा देऊनही त्यांची मदत झाली नाही . या शिवाय हातकणंगले मतदार संघात ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव झाला , जिथे वंचितच्या डी.  सी.  पाटील यांना 32,696 मते मिळाली. तर बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29,479 मतांनी पराभव झाला. येथे वंचितच्या वसंतराव मगर यांना 98,441 मते मिळाली. वंचित आघाडीसोबत असती तर ते स्वतःही आकोल्यातून विजयी झाले असते आणि ठाकरे गटाच्या आणखी तीन  जागा निवडून आल्या असत्या . या तीन जागा सोडल्या तर कॉँग्रेसला मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारांमुळे कुठलीही  हानी झाली नाही कारण त्यांच्या सर्वच उमेदवारांना मतदारांनी मोठे मताधिक्य दिले.

वंचित आघाडीसोबत नेमके काय झाले ?

वंचित बहुजन आघडीच्या प्रचंड मोठ्या स होऊनही वंचितच्या हक्काच्या मतदारांनी यावेळी वंचितची साथ सोडल्याचे दिसले.  आणखी एक गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी  वंचितला  ऐनवेळी उमेदवार बदलावे लागले, काही ठिकाणी उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद झाले.

2019 मध्ये वंचित-एमआयएम’ आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात 41 लाख 32 हजार 446 मते घेतली होती. एमआयएमसोबत छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती. वचिंतला 2019 मध्ये 14 टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. मात्र 2024 मधील निकलामुळे वंचितला पुन्हा पहिल्यापासून मोर्चेबांधणी करावी लागणार आहे . महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्याचा फटका वंचितला बसल्याची चर्चा, या निमित्ताने होते आहे.

इंडिया आघाडीच्याही आधी वंचित बहुजन आघाडीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी युती केल्याचे दोन्हीही नेत्यानी जाहीर केले होते मात्र ही युती प्रत्यक्षात येण्या आधीच तुटली . त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न झाले. कॉँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्यांना आधी तीन आणि नंतर पाच ते सहा जागांची ऑफऱही देण्यात आली होती. पण जागावाटपावरुन आणि परस्परांवर केल्या जाणाऱ्या टीकेतून बोलणी फिसकटली आणि इंडिया आघाडीकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला .

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला सध्या राजकारणात रस नसल्याचे सांगून जरांगे पाटील यांनी ही चर्चा संपविली . मात्र त्यांनी छत्रपती शाहू महारज , उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले . या घडामोडीनंतर  वंचितने राज्यात एकूण 38  जागांवर उमेदवार उभे केले होते  तर काही  जागांवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना आपला पाठिंबा दिला होता.

राज्यात वचिंतला एकही जागा मिळाली नाही…

देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात वातावरण असले तरी स्वतंत्र लढणाऱ्या वंचितसोबत जण्यापेक्षा वंचितच्या हक्काच्या मतदारांनी वंचितला सोडून मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले त्यामुळे महाविकास आघाडीने 30 जागा मिळवत भाजपचा आणि महायुतीचा पराभव करीत इतिहास घडवला. यामुळे या निवडणुकीत वंचितला हवे तसे यश तर मिळाले नाहीच शिवाय त्यांच्या उमेदवारांना  काही जागांचा अपवाद वगळता फारसे मतदानाही झाले नाही.  परिणामी वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला.

धक्कादायक बब म्हणजे प्रकाश आंबेडकरही तिसऱ्या क्रमांकावर गेले. येथे ना कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला न त्याचा आंबेडकरांना राजकीय फायदा  झाला . खरे तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागले होते.  निकालानंतर जेंव्हा चित्र स्पष्ट झाले तेंव्हा अनेक ठिकाणी तर वंचितच्या उमेदवारांना 5 ते 10 हजाराचा मतांचा टप्पाही पार करता आला नाही.

…. आणि अकोल्याची जागा गेली !!

खासकरून यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लगलेले होते. या ठिकाणी तिरंगी झाली. जेंव्हा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडे येत नाहीत हे स्पष्ट झाले तेंव्हा कॉँग्रेसने अखेरच्या क्षणी आपला उमेदवार दिला , जेंव्हा की स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कॉँग्रेसला न मागता नागपूरमध्ये पाठिंबा दिला होता परंतु येथे बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराने मोठ्या संख्येने मते घेतल्याने येथे भाजपच्या नितीन गडकरी यांनी कॉँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पराभूत केले.

दरम्यान अकोल्यात महाविकास आघाडी किंवा कॉँग्रेस आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही , असे वाटत असतानाच कॉँग्रेसने उमेदवार दिला. परंतु तिरंगी लढतीत पुन्हा एकदा ही जागा भाजपने कॉँग्रेस आणि वंचितचा पराभव करीत आपल्याकडे खेचून घेतली.   ही जागा जिंकणारे अनुप धोत्रे हे  मावळते खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत.  या जागेवर प्रारंभीच्या  फेऱ्यांमध्ये  काँग्रेसच्या अभय पाटील यांनी जोरदार आघाडी घेतली मात्र अखेर धोत्रेंनी 4,57,030 मतांसह विजय मिळवला, तर पाटील यांना 4,16,404  मते  मिळाली आणि  आंबेडकरांना 2,76,747 मते  प्राप्त झाली. आणि अकोल्याची जागा गेली . खरे तर वंचित महाविकास आघाडीत सहभागी झाली असती तर ही जागा भाजपकडे न जाता वंचितकडे आली असती आणि प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा 1999 नंतर संसदेत गेले असते.

वंचितचे स्वतःचेच झाले  मोठे नुकसान , महाविकास आघाडीवर परिणाम नाही ….

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे  गेल्यावेळी  वंचित -एमआयएम युतीमध्ये औरंगाबादची जागा एमआयएमच्या  इम्तियाज जलील यांनी पटकावली होती मात्र नंतर ही युती विधानसभेला राहिली नाही. यावेळी मात्र ही जागा (छत्रपती संभाजीनगर)  एमआयएमचे मावळते खासदार इम्तियाज जलील यांना  पराभूत करीत शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे 1,34,650 मताधिक्याने जिंकली. त्यांना 4,76,130 मते मिळाली, तर इम्तियाज जलील यांना 3,41,480 मते मिळाली. वंचितचे अफसर खान यांना मात्र केवळ  69,266 मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या मतांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारावर फारसा परिणाम झाला नाही कारण येथे आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली .

या मतांमध्ये  वंचितचे अफसर खान यांची मते मिळवली तरी शिंदे गटाचे  विजयी उमेदवार संदिपान भुमरे यांना वंचित पेक्षा 4 लाख 6 हजार 864 मतांची आघाडी होती. तर खैरे 2 लाख 93 हजार 450 मते घेऊन 1 लाख 82 हजार 680 मतांनी पिछाडीवर होते . परिणामी वंचितच्या उमेदवारांचा येथे काहीही परिणाम झाला नाही. तर जळगाव, रावेर, रायगड, रत्नागिरी, कल्याण, मावळ, पुणे, पालघर, उत्तर मुंबई, सातारा या भागात विजयी उमेदवारांचे मताधिक्यही इतके  जास्त आहे, की वंचितच्या उमेदवारांची मते  मिळूनही त्यांना विशेष फायदा झाला नसता. वंचितने नागपूर, कोल्हापूर, सांगली आणि बारामती या चार मतदारसंघात पाठिंबा दिला होता. यापैकी कोल्हापूर, सांगली आणि बारामतीत मविआ जिंकली, मात्र बसपामुळे  नागपुरात वंचितचा फारसा प्रभाव दिसला नाही त्यामुळे येथे भाजप विजयी झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!