Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : मोठी बातमी : केवळ अयोध्याच नव्हे तर हिंदुत्वाच्या या बालेकिल्ल्यात मतदारांनी भाजपाला नाकारले … !!

Spread the love

नवी दिल्ली : एनडीएने सर्वाधिक जागा मिळवल्या तरी राजकीय विश्लेषकांनी भारतीय जनता पक्षाच्या जय पराजयाचा पंचनामा सुरु केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ च्या तुलनेने तब्बल ६३ जागांचा मोठा फटका बसला त्यामुळे भाजप मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू शकली नाही. म्हणजे मागील निवडणुकीच्या ३०३ जागांवरून भाजपाची थेट २४० जागांपर्यंत घसरण झाली आहे. विशेष म्हणजे पराभूत झालेल्या जागांमध्ये भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठित असलेल्या अयोध्येतच विरोधकांनी मात दिली आहे. तर भाजपाच्या कमी झालेल्या ६३ जागांपैकी तब्ब्ल १४ जागा फक्त अयोध्या व वाराणसीच्या आसपासच्या कथित हिंदुत्वाच्या प्रभावक्षेत्रातल्या आहेत.

एकीकडे भाजपने देशभरातील आपल्या प्रत्येक प्रचार सभेत रामाच्या नावाचा जप करून सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्येबाबतचा ऐतिहासिक निकाल आणि राम मंदिराची उभारणी या मुद्यांचे मोठे भांडवल केले. इंडिया आघाडी आली तर पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त केले जाईल असेही आक्रमकपणे सांगितले मात्र त्याच अयोध्येत भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. इतकेच नव्हे तर या भागातील ९ मतदारसंघांपैकी तब्बल ५ मतदारसंघांमध्ये भाजपला इंडिया आघाडीने धोबीपछाड दिली. दुसरीकडे वाराणसीत मोदींनाही यावेळी केवळ दीड लाखाचे मताधिक्य मिळाले. तर सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये स्वतः मोदी पिछाडीवर होते इतकेच नव्हे तर वाराणसीच्या आसपासच्या १२ पैकी तब्बल ९ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. हा धक्काही भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपाला अयोध्येत कुणी हरवले ?

अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते, त्या फैझाबाद मतदारसंघात भाजपाचा विजय निश्चित मानला जात होता. फैजाबाद लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पाचही विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. अयोध्येत समाजवादी पक्षाने उभे केलेले दलित समाजातील उमेदवार अवधेश प्रसाद सिंह यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपाकडून यंदा हा मतदारसंघ गेला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

भाजपच्या प्रभावक्षेत्रात एकसाथ ५ पराभवांचा नामुष्की…

दरम्यान भाजपच्या प्रभावक्षेत्रातील जवळपास ९ मतदारसंघांपैकी अयोध्येसह आजूबाजूच्या ५ जागाही भाजपकडून समाजवादी पक्षाने हिसकावून घेतल्या. सुल्तानपूरमधून वरुण गाधींना उमेदवारी नाकारून त्यांच्या आई मनेका गांधींना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभवाचा येथून सामना करावा लागला. योगीचा गढ असलेल्या गोरखपूरहून आयात केलेले सपाचे उमेदवार राम भुवाल निशाद यांनी मनेका गांधींचा पराभव केला. याशिवाय बस्ती लोकसभा मतदारसंघात दोन टर्म खासदार असलेले भाजपचे हरिष द्विवेदी यांचाही सपाच्या उमेदवाराने पराभव केला.

विशेष म्हणजे राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर भाजपला आंबेडकर नगर आणि श्रावस्ती या दोन मतदारसंघांमध्ये विजयाची आशा होती. खुद्द राम मंदिर उभारणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांचे पुत्र साकेत मिश्रा श्रावस्तीहून उभे होते. पण या दोन्हीही मतदारसंघांमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. या प्रदेशातील कैसरगंज, गोंडा, दोमरियागंज आणि बाहरीच या मतदारसंघांत मात्र भाजपाचे उमेदवार विजयी झाले. यापैकी कैसरंगमधून भाजपचे वादग्रस्त नेते ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र करण सिंह उभे होते.

वाराणसी आली, पण इतर मतदारसंघ गेले ….

अयोध्या तर अयोध्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असलेल्या वाराणसी प्रभावक्षेत्रातही भाजपचा मोठा पराभव झाला. त्यात भाजपा व मित्रपक्ष अपना दल-सोनेलाल यांना या भागातील १२ पैकी तब्बल ९ मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. २०१९ मध्ये यातील ७ मतदारसंघांमध्ये भाजपा-अपना दल आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते.

यंदा मात्र आघाडीला फक्त तीन ठिकाणी विजय मिळवता आला. त्यातही अपना दल-सोनेलाल पक्षाची एक जागा आहे. त्यामुळे भाजपाला या भागात फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. चंडौली मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचा यावेळी पराभव झाला आहे. २०१४ आणि २०१९ असे सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाने जिंकलेले रॉबर्टगंज आणि बलिया हे मतदारसंघही यावेळी समाजवादी पक्षाच्या ताब्यात गेले आहेत.

या भागात भाजपाने जिंकलेल्या दोन जागांपैकी एक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी ही जागा आहे. दुसरीकडे भदोहीतून विनोद कुमार बिंड यांनी तृणमूलच्या ललितेश पती त्रिपाठी यांचा पराभव केला. तर मिर्झापूरमधून सलग तिसऱ्यांदा अपना दल-सोनेलाल पक्षाच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल निवडून आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!