प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात आज सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे त्यांना यापूर्वी देखील अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे नुकतेच त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते. त्यांनी द चर्निंग विथ विजय तेंडुलकर (1984), सत्यजित रे (1988), आणि द मार्केटप्लेस (1989) या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 8 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सन 1976 मध्ये भारत सरकारने देशाचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. 1991 मध्ये, त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी देशातील तिसरा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. 2005 मध्ये, श्याम यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे, भारतीय सिनेसृष्टीचे एक चालतं बोलतं विद्यापीठच आज बंद पडलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
8 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, अनेक हीट चित्रपट
बेनेगल यांनी जुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाष चंद्र बोसः द फॉरगोटन हीरो, मंडी, आरोहन, वेलकम टु सज्जनपुर यांसारखे अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय चित्रपट बनवले. त्यांच्या आर्ट चित्रपटांनी 8 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. श्यान बेगेनल यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. श्याम बेनेगल यांनी करियरमध्ये 24 चित्रपट, 45 डॉक्यूमेंट्री आणि 1500 एड फिल्म्स बनवल्या आहेत.
१४ डिसेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि समांतर चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अंकुर, निशांत, मंथन, जुबैदा, वेलकम टू सज्जनपूर हे त्यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट गाजले होते. याशिवाय देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज या दूरदर्शनवरील महत्त्वाकांक्षी मालिकेचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. श्याम बेनेगल यांच्या सिने सृष्टीमधील योगदानाची दखल घेत त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण तर २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.