RajsthaNewsUpdate : बाल इंद्रकुमारच्या हत्येवरून राजस्थान तापू लागले ….

झी मीडियाने प्रसिद्ध केलेले संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाण्याचे टाकीचे छयाचित्र…
जयपूर : राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण हळूहळू तापत आहे. एका शाळेतील शिक्षकाने इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका ९ वर्षीय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. या बाल विद्यार्थ्याने तथाकथित “उच्च जाती” साठी असलेल्या भांड्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणावरून सत्ताधारी काँग्रेससाठी राजकीय संकट ओढवले आहे. दरम्यान काँग्रेसचे आमदार पंचांड मेघवाल यांनी आपला राजीनामा दिला आहे.
या प्रकरणात केवळ विरोधी पक्ष म्हणून भाजपच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवरच हल्लाबोल करत नाही, तर त्यांना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी घेरले आहे. काँग्रेस नेतेही गेहलोत सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
काँग्रेस आमदाराचा राजीनामा…
बरण-अत्रू येथील काँग्रेसचे आमदार पानचंद मेघवाल यांनी ९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. राज्यातील जातीसंबंधित गुन्ह्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, पोलिस अशा प्रकरणात लवकर कारवाई करत नाहीत. दरम्यान काँग्रेस नेते सचिन पायलट जालोरला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
पायलट म्हणाले, “आम्हाला जालोरसारख्या घटनांना आळा घालायचा आहे. दलित समाजातील लोकांना आम्हाला आश्वासन द्यायचे आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.” ते म्हणाले, “सरकार योग्य ती कारवाई करत आहे आणि भविष्यातही करेल. अशा मुद्द्याचे राजकारण करणे थांबवले पाहिजे.” असे ते म्हणाले. प्रदेश काँग्रेस कडून इंद्रकुमारच्या कुटुंबियांना २० लाखाची सानुग्रह मदत देण्यात आली आहे.
उच्चवर्णीय लोक वापरत असलेल्या भांड्यातून पाणी प्यायल्याबद्दल शिक्षकाने नऊ वर्षांच्या इंद्राला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे इंद्राच्या डोळ्याला आणि कानाला दुखापत झाली. २० जुलै रोजी एका खासगी शाळेत हा प्रकार घडला होता. त्यानंतर जखमी विद्यार्थ्याला गुजरातमधील अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्याच्यावर उपचार चालू असतानाच गेल्या आठवड्यात त्याचे निधन झाले.
खुनाच्या रोपवरून शिक्षक अटकेत
या प्रकरणात शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्यावर खुनाचा तसेच अनुसूचित जाती आणि जमातींचे संरक्षण कायद्यांतर्गत ( ऍट्रॉसिटी ) नुसार कारवाई केली आहे.
या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की इंद्र “भोळा होता आणि उच्च जातीच्या शिक्षकासाठी भांडी बाजूला ठेवली होती हे त्याला माहित नव्हते”. एफआयआरमध्ये म्हटले आहे, “शिक्षक चैल सिंग यांनी मुलाला सांगितले, ‘तू खालच्या जातीचा आहेस. माझ्या घागरीतून पाणी पिण्याची तुझी हिंमत कशी झाली!’ त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते की त्यांनी या प्रकरणाचा जलद तपास करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.५ लाखांची मदत जाहीर करताना ते म्हणाले होते, “पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय दिला जाईल.”
दरम्यान राज्य सरकारवर निशाणा साधत भाजपने म्हटले की, मुलाचा मृत्यू लाजिरवाणा आहे. राज्य भाजपने ट्विट केले होते की, “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी राजस्थानमधील दलितांना न्याय मिळावा यासाठी श्री गेहलोत यांना कधी सुचविणार आहेत.?”