Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांचे शाब्दिक बाण …

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा मुंबई , मराठी माणूस आणि महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. 

शुक्रवारी  जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.

राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही…

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.  पवार यांनी म्हटले आहे कि , “या राज्यपालांबद्दल काय बोलावं. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत एक भयानक विधान केले होते. त्यांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने तीच पुनरावृत्ती केली. महाराष्ट्र किंवा मुंबईबद्दल त्यांनी भाष्य केले. मुंबई किंवा महाराष्ट्र सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आहेत. मुंबईची प्रगती सर्वसामान्यांच्या कष्टातून झाली. असे असताना अशा प्रकारची विधाने करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. मी याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि अंत:करण यात काही फरक नाही. ” 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका

राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे तसेच या पदावर महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून राज्यपालांचे समर्थन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र राज्यपालांचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी लगावलेला टोला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मराठी नेत्यांना आहे. या पक्षांनी एवढे वर्षे सत्ता उपभोगली. पण हे पक्ष अजूनही अर्थिक व्यवहार महाराष्ट्राच्या हातामध्ये देऊ शकलेले नाही. हा व्यवहार अजूनही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यपालांचं हे पार्सल परत पाठवायला हवं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच राज्यापालांच्या भाषणाची स्क्रिप्ट दिल्लीतून येते मुंबईतून असा प्रश्न उपस्थित करत भाजपादेखील चिमटा काढला. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला चढवला.

“आज राज्यपालांनी कहर केला आहे. मुंबईला गौरवशाली इतिहास आहे. मुंबई, मराठी माणसाची ओळख जगभरात आहे. यांचं गांभीर्य महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवणाऱ्या व्यक्तीला नाही, याची खंत आहे. ही मुंबई कोश्यारी यांनी आंदण दिलेली नाही. मराठी माणसाने मेहनतीने घेतलेली आहे. त्यामुळे राज्यपालांचं हे पार्सल परत करायला हवं”, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या, शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र, आता त्यांना कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली आहे. कारण कोल्हापुरी जोडा हेही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, जगप्रसिद्ध कोल्हापुरी जोडे कोश्यारींना दाखवण्याची वेळ आली आहे.”

राज ठाकरे यांचा इशारा…

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आपल्याता आत्ता सांगतो, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींना इशारा दिला आहे.

महाराष्ट्रच्या जडणघडणीत मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक, मराठी साहित्यक, विविध क्षेत्रातील मराठी लोक यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे.” राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

याशिवाय हा ‘महाराष्ट्राचा घोर अपमान असून ! ५० खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत’ असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी विचारला आहे. तर राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असून त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!