Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPNewsUpdate : निकाल काहीही लागो राष्ट्रवादीने ओबीसी उमेदवारांच्या बाबत घेतला हा मोठा निर्णय

Spread the love

मुंबई : राज्यातील सर्वच पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या  महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.  विशेष म्हणजे  या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत कारण हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे निकाल काहीही लागो राष्ट्रवादी काँग्रेसने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हि माहिती दिली आहे. असाच निर्णय भाजपनेही या आधीच घोषित केला आहे. 

यासंदर्भात जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , “ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.” तसेच, “ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू,” अशी ग्वाहीदेखील जयंत पाटील यांनी दिली. यापूर्वी “निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे,” असे जयंत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयात काय होणार हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!