Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस , मुंबई, पुण्यालाही झोडपले , सावधानतेचा इशारा …

Spread the love

मुंबई  : पावसाळा सुरु होऊन एक एक महिना उलटल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने  पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाने  जोरदार हजेरी लावली असून कोकणात काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या ४ ते ५ दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस कोसळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोकणात पूर परिस्थिती

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील २६ गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील १ हजार ७१६ रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २५ फूट ८ इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतही मुसळधार पाऊस

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरु होता. सकाळी काही काळ पावसाने  विश्रांती घेतली होती. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. मुंबईत पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ आणि ८जुलैला मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुसळधार पावसाचा  इशारा

आज मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईत कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने  प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.

नागरिकांची तारांबळ

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचल्याने  नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने  ट्वीट केलेल्या छायाचित्रांमध्ये सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमधील रस्तेही जलमय झाले होते. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम झाला होता. मुंबई लोकलच्या तिनही मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने  सुरु होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

दरम्यान मुंबईत काल मुसळधार पाऊस कोसळत असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला. यावेळी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व माहिती दिली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असलेल्या ५००० सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सर्वत्र प्रशासन दक्ष , नागरिकांना सावधानतेचा इशारा

जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!