ShivsenaNewsUpdate : शिवसेनेच्या ३९ बंडखोरांबाबत नेतृत्वाचा मोठा निर्णय …

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश न पाळणाऱ्या बंडखोर ३९ आमदारांविरोधात शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे निलंबन याचिका दाखल केली आहे. पक्षाने व्हीप बजावूनही ३९ आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केले आहे. त्यासंबंधीचे व्हिडीओ रेकॉर्ड उपलब्ध आहे. सदरील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची आज आवाजी मतदान पद्धतीचा अवलंब करीत निवड करण्यात आली. या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत विजय मिळवला तर १०७ मते घेऊन शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी पराभूत झाले. दरम्यान शिवेसेनेच्या सर्वच्या सर्व बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे गट नेते अजय चौधरी यांनी व्हिप जरी करूनही भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केले. व्हीप बजावल्यानंतर बंडखोरांपैकी काही मते आपल्या बाजूने वळतील, अशी शिवसेनेला आशा होती. मात्र एकाही बंडखोर आमदाराने राजन साळवी यांना मत दिले नाही. साहजिक राजन साळवी यांचा पराभव झाला. बंडखोर उमेदवारांच्या या घडामोडी लक्षात घेता शिवसेनेने आज आक्रमक पाऊल उचलत बंडखोरांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
“त्या” ३९ आमदारांवर निलंबनाची कारवाई करा
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि , शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केले त्यामुळे पक्षाच्या व्हिप च्या विरोधात मतदान करणाऱ्या ३९ आमदारांच्या निलंबनाची याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
दरम्यान शिंदे गटानेही व्हीप काढला आहे. त्यांनीही शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, या प्रश्नावर उत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले, “शिंदे गटाचं अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का? शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे, पक्षाला मान्यता आहे त्यामुळे दोन तृतीयांश आमदार असल्याचे सांगून भ्रम निर्माण केला जात आहे. विधिमंडळ कार्यालयाच्या चाव्या शिंदे गटाकडे असल्याच्या बातम्या चुकीच्या, उद्या कार्यालय उघडेल, असेही खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.