MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने भाजपमध्ये जल्लोष…

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेने भारतीय जनता पक्षात जल्लोषाला सुरुवात झाली. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भाजप नेते घोषणाबाजी करताना, मिठाई वाटताना दिसले. त्याच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना बहूमत सिद्ध करण्याची मागणी केली होती. या मागणीवर तत्काळ कारवाई करीत राज्यपालांनी २४ तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारला दिले होते.
दरम्यान महाराष्ट्रात फ्लोर टेस्ट थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर बुधवारी संध्याकाळी ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्रात फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते, त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केवळ १५ आमदारांवर कमी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या टीमने गुरुवारी बोलावण्यात आलेली फ्लोअर टेस्ट थांबवावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेत केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपचे देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. या राजकीय पेचप्रसंगाची सुरुवात करणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने न गेल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आधीपासूनच होती. बुधवारी संध्याकाळी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटकळांना उधाण आले, जिथे सरकारने दोन शहरांचे नाव बदलले आणि ठाकरे यांनी त्यांच्या सहकार्याबद्दल मंत्र्यांचे औपचारिक आभार मानले.
राजीनाम्याची घोषणा करताना ठाकरे फेसबुकवर लाईव्ह आले आणि म्हणाले, ‘ज्यांना आम्ही मोठे केले आणि निर्माण केले, त्यांनी आम्हाला दगा दिला. अनपेक्षितपणे सत्तेवर आलो आणि अशा प्रकारे मी बाहेर पडत आहे. शिवसेना हे कुटुंब आहे, ते तुटू देणार नाही. मी कुठेही जात नाहीये.’