Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Abhivyakti : महाप्रहार । बाबा गाडे : संभाजी राजे यांना गर्भगृहात प्रवेश मनाई ? धर्माचे ठेकेदार कुठे आहेत ?

Spread the love

प्रजासत्ताक दिनानंतर देशाला नवी राज्यघटना मिळाली आणि जात , धर्म , वंश , रंग आणि लिंगभेदावरून कोणालाही सार्वजनिक ठिकाणी आणि  धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही असे म्हटलेले असताना छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिराच्या गर्भगृहात संभाजीराजे छत्रपती यांना प्रवेश नाकारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्थात केवळ तुळजापूरच नव्हे तर अनेक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या धार्मिक भावनेतून घटनेतील समानतेच्या मुद्याला बगल देऊन भेदभाव केला जातो हे उघड आहे. पुरीच्या मंदिरात तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंदिराच्या दारातूनच पूजा करावी लागली हे चित्र देशाने पहिले आहे परंतु पुरोगामित्वाचा आणि समानतेचा , समरसतेचा डंका पिटणाऱ्यांनी यावरून कधीच आपल्या प्रतिक्रिया दिल्या नाही हे वास्तव आहे.


या देशात पंतप्रधान , राष्ट्रपतींनीही मंदिर प्रवेश नाकारला जातो …

त्यामुळे खरे तर मंदिरात प्रवेश नाकारणे हि काही या देशात पहिली बाब नाही. या देशात विधवा म्हणून पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांनाही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. इतकेच नव्हे तर आजही या देशात शब्दशः हिंदू असलेल्या दलितांना गर्भगृहात सोडा , मंदिराच्या दारातही उभे राहू दिले जात नाही , हे वास्तव कसे विसरून चालेल ? त्यामुळेच शरद पवार यांनी प्रा. जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा आधार घेऊन मंदिर प्रवेश नाकारण्यावर भाष्य केले होते.

डॉ . बाबासाहेबांचे मंदिर प्रवेशाचे आंदोलन

मंदिर प्रवेशावरून इतिहासात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनीही मोठे आंदोलन केले होते. यामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराचा आणि पुण्यातील पार्वतीचा सत्याग्रह या संघर्षाला विसरता येत नाही. सावरकरांनी स्वतः या आंदोलनाला पाठिंबा देऊनही हा लढा तत्कालीन धर्म मार्तंडांनी यशस्वी होऊ दिला नाही. अखेर बाबासाहेबांनी कर्मठ हिंदूंच्या नदी लागणे सोडून आपल्या लाखो अनुयायांसह उच्च निच्चतेने जर्जर झालेल्या सनातनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. तेंव्हापासून बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करणाऱ्या बौद्धांनी मंदिराचा आणि देवांचा नाद सोडला आहे परंतु जे लोक हिंदू दलित आहेत त्यांना मंदिरात तर सोडा मारुतीच्या परावरही जाऊ दिले जात नाहीत. त्यांनी कितीही हनुमान चालीसा म्हणायची तयारी दर्शविली तरीही… आणि विशेष म्हणजे आजही ” सर्व हिंदू एक आहेत. ” अशा वल्गना करणारे हिंदू धर्माचे ठेकेदार यावर उघडपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत. कारण धार्मिक दृष्ट्या त्यांना हे हिंदू एकत्र नको आहेत तर फक्त राजकीय दृष्ट्या आणि मुस्लिमांच्या विरोधात सर्व हिंदू म्हणून एकत्र हवे आहेत.

मराठ्यांचा दत्त मंदिर प्रवेश आणि राजर्षी शाहू महाराज …

राजर्षी शाहू महाराजांच्या काळातही कोल्हापूर प्रांतातील एका दत्त मंदिरात मराठ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र मंदिर प्रवेशाचा हट्ट जेंव्हा मराठ्यांनी धरला तेंव्हा मोठी दंगल उसळली. मंदिराच्या पावित्र्याची काळजी घेणाऱ्या धर्मरक्षकांनी मंदिर प्रवेशाचा हट्ट धरणाऱ्या अनेक भाविकांची डोकी फोडली. हि वार्ता जेंव्हा शाहू महाराजांच्या कानावर गेली तेंव्हा महाराजांनी स्वतः कायद्याने हा भेदभाव नष्ट करून सर्वांना मंदिर प्रवेशाचे फर्मान काढले याचा नेकांना विसर पडावा हे गंभीर आहे.

“राडा ” बाईंना माहित नाही असे कसे म्हणता येईल ?

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या एका  प्रकरणावरून मी मागासवर्गीय आहे असा टाहो फोडणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरणाऱ्या राणा बाईंनी स्वतःला मागासवर्गीय म्हणून उत्तर भारतातील हनुमान मंदिरात जाऊन  दाखवावे . खरे तर अनेक मारुती मंदिरात मारुती “ब्रह्मचारी ” असल्यामुळे महिलांना प्रवेश नाही मग त्या तथाकथित सवर्ण समाजच्या असल्या तरी … हे या “राडा ” बाईंना माहित नाही असे कसे म्हणता येईल ? मग उत्तरेत जा नाही तर दक्षिणेत जा … इतकेच कशाला श्रद्धेच्या नावाखाली शनी शिंगणापूरमध्ये सुद्धा महिलांना प्रवेश नाही. यावर जेंव्हा बोलण्याची वेळ येते तेंव्हा पावित्र्याच्या नावाखाली महिलाच महिलांना विरोध करतात याचा अनुभव तृप्ती देसाई नामक  सामाजिक कार्यकर्तीने स्वतः घेतला आहे. मात्र चर्चा होते आहे ती छत्रपती संभाजी राजे यांची … आणि एका दृष्टीने हे योग्य आहे पण यावर अद्याप धर्माचे ठेकेदार असलेले कुणीही बोलले नाही, हे उल्लेखनीय !!

संभाजीराजे यांना अडवणारे कोण आहेत ?

इतर सर्वसामान्य भाविकांना मंदिर प्रवेशापासून रोखले जाते हि वस्तुस्थिती असली तरी साक्षात तुळजाभवानीच्या पूजेचा मान असणाऱ्या छत्रपती घराण्यातील वंशजालाच मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याने मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या भेदभावाला आक्षेप घेत तुळजापूर बंद करून निषेध नोंदवला असून या प्रकाराला जबादार असणाऱ्यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली आहे.

अर्थात हा प्रवेश नेमका कोणी नाकारला या मागे मंदिराचे पुजारी आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परंतु संभाजी राजे यांना अडविणारे मंदिराच्या देखभालीची धुरा सांभाळणारे शासकीय अधिकारी आहेत . मंदिराचे प्रशासन सांभाळण्याची कायदेशीर जबाबदारी त्यांची आहे. या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना नेमक्या कुठल्या नियमाखाली प्रवेश नाकारला याची चर्चा आता होताना दिसत आहे.

काय आहे ? देवुल ए कवायती कायदा ?

छत्रपती संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास मंदिर प्रशासनाने “देवुल ए कवायती कायदा”  कलम ३६ नुसार मनाई केली असे सांगितले जात आहे. त्याचे असे आहे , कि स्वातंत्र्यापूर्वी  तुळजाभवानी मंदिर हे निजाम सरकारच्या ताब्यात होते त्यामुळे  निजाम सरकारने मंदिराची व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून  ११३ वर्षांपुर्वी “देवुल ए कवायते कायदा” , म्हणजेच एक  (नियमावली) तयार केली होती. या नियमावलीमध्ये १ ते ५६ नियम आहेत आणि विशेष म्हणजे सर्व जुने कायदे संपुष्ठात येऊन ७५ वर्षे उलटली असली तरी निजामाचा हा कायदा येथे का लागू आहे ? आणि  त्या नियमाची अंमलबजावणी आज ही का केली जाते ? असे काही प्रश्न यातून निर्माण झाले आहेत.

….आणि काय आहे कलम ३६ ?

निजामाने बनवलेल्या देवुल ए कवायते कायद्यातील ५६ पैकी कलम ३६ हे पुजारी , ब्राम्हण , सेवेदार यांच्यासाठी असून या कलमानुसार पाळीचा पुजारी व कमाईसदार हेच केवळ गाभाऱ्यात थांबू शकतात, असा नियम आहे. अर्थात निजामासाठी हे सर्व कायदे तत्कालीन पुजाऱ्यानीच केले असणार हे उघड आहे परंतु प्रश्न असा आहे कि , हे निजामाचे हे  कायदे तुळजापुरात अद्यापही लागू आहेत हि आश्चर्याची गोष्ट आहे .

या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

छत्रपती संभाजीराजे यांचा मंदिर प्रशासनाने केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच मंदिर संस्थानचे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे,मंदिर व्यवस्थापक मतहसिलदार योगिता कोल्हे यांना निलंबित करा, या मागणीसाठी तुळजापूर शहरवासियांनी आज तुळजापूर शहर १००% बंद केले. या माध्यमातून मंदिर संस्थानचा निषेध करण्यात आला. संबधित अधिकाऱ्यांना निलंबित न केल्यास हा लढा महाराष्ट्रभर करु, असा इशारासुद्धा देण्यात आला. परंतु या छोट्या अधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवत छत्रपती संभाजी राजे यांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्यानंतर स्वतः संभाजीराजे यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत जाब विचारत आपला संताप व्यक्त केला होता तरीही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना का दिल्या नाहीत ? याबद्दल त्यांची काहीच जबाबदारी नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार हाही एक प्रश्नच आहे. विशेष म्हणजे याच्या आधी कितीतरी वेळा आणि काही दिवसांपूर्वीच गर्भगृहात जाऊन पूजा केली होती मग तेंव्हा कायद्याचे पालन झाले नव्हते काय ?

धर्माच्या ठेकेदारांनी यावर बोलायला हवे….

खरे तर मंदिर प्रवेश असो कि , गर्भगृहातील प्रवेश…  या विषयावर हिंदू धर्म वाचविण्याच्या सतत डरकाळ्या फोडणाऱ्या  धर्माच्या ठेकेदारांनी बोलायला हवे. आणि हो ते संभाजी राजे यांच्या विषयावर कदाचित बोललेच तर त्यांना बोट दाखवायला “निजाम ” सापडला आहे . पण या निजामाला हि नियमावली करून देणाऱ्यांची नावे कधीच उघडी पडली जाणार नाहीत. इथे पुन्हा तोच विषय आहे . संभाजी महाराजांना ” हाल हाल करून जीवे मारण्याची शिक्षा देणारा औरंगजेब खलनायक आहे पण संभाजी राजांना निजामाच्या तावडीत सापडून देणारे , औरंगजेबाच्या हुकुमाची तामील करणारे , त्यांना कशा प्रकारे शिक्षा द्यावी याचा सल्ला देणारे कोण होते ? त्याची चर्चा कोणीच करीत नाही. तसेच हे आहे . संभाजीराजे छत्रपती यांना गर्भगृहात जाण्यापासून रोखणारा येथे निजाम आहे हेच खरे.

•बाबा गाडे

मुख्य संपादक , महानायक

9421671520

आपलं सरकार

Click to listen highlighted text!